धनगर समाजाला हक्काची घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2015 11:37 PM2015-05-11T23:37:38+5:302015-05-11T23:51:02+5:30
समाजासाठी आदर्श : संतोषकुमार दळवींनी घेतला पुढाकार
कसई दोडामार्ग : तालुक्यातील धनगर समाजातील ग्रामस्थांना स्वत:च्या मालकीची जमीन नसल्याने त्यांना स्वत:चे हक्काचे घर मिळत नाही. कोणी जागा देतील तेथे राहतात. हा समाज अद्याप मागास आहे. धनगर वस्तीमध्ये लाईट, पाणी आदी सुविधांची वानवाच आहे. शासनानेही पाठ फिरविल्याने एकाकी पडलेल्या धनगर वस्तीसाठी दोडामार्ग येथील सामाजिक कार्यकर्ते संतोषकुमार दळवी वरदान ठरले आहेत. पदरमोड करून धनगर समाजाला त्यांनी हक्काची घरे बांधून दिली. ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. याचा आदर्श इतर दानशूर व्यक्तींनी घेतल्यास समाजात कुणीही हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही.
भटक्या जमातीतील घोटगेवाडीतील धनगर समाजातील तुकाराम लक्ष्मण जंगले यांच्यासमोर हक्काच्या घराची विवंचना होती. त्यांनी आपले अर्धेअधिक आयुष्य केमळ्याच्या झोपडीत काढले. अखेर नियतीला जाग आली असावी, म्हणनूच दोडामार्गातील सामाजिक कार्यकर्ते संतोषकुमार दळवी यांनी त्यांना हक्काचे घर बांधून दिले. त्यामुळे जंगले यांनी दळवी यांचे आभार मानले.
ही गोष्ट येथेच थांबली नाही. जंगले कुटुंब गेली कित्येक वर्षे घोडगेवाडी धनगरवाडीत राहत होते. ना रेशनकार्ड, ना जमीन. यामुळे शासनाच्या विविध योजनांपासून हे कुटुंब वंचित होते. त्यांच्याकडे काही शेळ्या होत्या. त्याही झोपडीच्या बाजूलाच बांधत असल्याने याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर झाला. जंगले यांच्या पत्नीला क्षयरोगाची लागण झाली. अशा बिकट परिस्थितीत जगत असताना देवाच्या रुपात त्यांच्या मदतीला धावले संतोषकुमार दळवी!
बेघराला मिळाले घरकुल
दोडामार्गचे सामाजिक कार्यकर्ते व घोडगे गावचे सुपुत्र संतोषकुमार दळवी यांना जंगले कुटुंबाची हलाखीची परिस्थिती समजताच त्यांनी जंगले यांची भेट घेतली. त्यांची हलाखीची परिस्थिती पाहून लगेच शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली व घरकुल योजनेतून घर बांधून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु लाभार्थ्याची जमीन, रेशनकार्ड, दारिद्र्यरेषेखाली नाव नाही, असे अनेक प्रश्न समोर आले.
दळवी यांनी २००८ मध्ये शासनाकडे अर्ज सादर करून जंगले यांचे नाव दारिद्र्यरेषेखाली घालावे, असे सांगितले होते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांने त्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या. दळवी यांनी याच्यातूनही मार्ग काढत घर बांधण्यासाठी येणारा खर्च काढला. जंगले यांनी बारा हजार रुपये जमा केले. उर्वरित ६० हजार रुपयांची रक्कम दळवी यांनी स्वत: घालून घर पूर्ण केले. जंगले यांना हक्काचे घर मिळाले. गृहप्रवेशाचा कार्यक्रम करून जंगले यांनी घरातही प्रवेश केला. या कार्यक्रमास संतोषकुमार दळवी यांच्यासह गणपत देसाई, संदीप नाईक, संजय मणेरीकर आदी उपस्थित होते. जंगले यांच्या घराच्या परिसरात संतोषकुमार दळवी यांनी नारळाची झाडेही लावली. (प्रतिनिधी)
पाच कुटुंबांना दिला आधार
दळवींवर कौतुकाचा वर्षाव
स्वत:ची जमीन नसलेल्या, घर बांधण्याची आर्थिक आणि मानसिकही क्षमता नसलेल्या एका बेघराला संतोषकुमार दळवी यांनी स्वप्रयत्नातून आणि स्वखर्चातून घर बांधून दिले. त्यांच्या या कार्याचे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे.
दुप्पट आनंद मिळतो
आपल्या तालुक्यात अनेक दानशूर व्यक्ती आहेत. परंतु देण्याची, मदत करण्याची इच्छा प्रत्येकाची नसते. मी एका गरीब कुटुंबातच जन्माला आलो असल्यामुळे गरिबीतील दिवस कसे असतात, याची मला जाण आहे. माझ्यामुळे कोणाच्या जीवनात आनंदाचे दिवस येत असतील, तर मी ते काम प्राधान्याने करीन. त्यांच्यापेक्षा दुप्पट आनंद आपल्याला मिळतो.
- संतोषकुमार दळवी, सामाजिक कार्यकर्ते, दोडामार्ग.
घोटगेवाडी -धनगरवाडी येथील चार कुटुंबांना दळवी यांनी घरे बांधून दिली असून, जंगले यांचे हे पाचवे घर आहे.
ही पाचही कुटुंबे आज दळवी यांच्या मदतीमुळे आनंदाचे जीवन जगत आहेत. त्यांचे स्वत:च्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यांनी संतोषकुमार दळवी यांचे आभार मानले आहेत.