सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप-उबाठा कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, तणावपूर्ण वातावरण
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: December 22, 2023 07:20 PM2023-12-22T19:20:13+5:302023-12-22T19:20:44+5:30
आमदार वैभव नाईकांसमोरच कार्यकर्ते आमने सामने
सिंधुदुर्ग : उबाठा सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासमोर सेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीची घटना कुडाळ तालुक्यातील डिगस येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने काही वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या पोलिस संरक्षणात आमदार वैभव नाईक यांना बाजूला करण्यात आले.
कुडाळ मालवण मतदार संघातील डिगस येथे रस्त्याच्या कामावरून भाजप आणि उबाठा सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाचीचे रूपांतर धक्काबुकीपयंत पोहोचले. पणदूर घोडगे रस्ता डांबरीकरण, मजबुतीकरण कामाचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी उद्घाटन होणार होते.
यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी सत्ता आमची, निधी आमचा, मग उद्घाटन तुम्ही का करता ? असा प्रश्न यानिमित्ताने वैभव नाईक यांना यावेळी विचारण्यात आला. यावेळी शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर हमरातुमरी झाली. काही प्रमाणात धक्काबुक्कीही झाली. मात्र, उपस्थित पोलिसांनी मध्यस्ती करत वैभव नाईक यांना बाजूला करून हे प्रकरण शांत केले