कसई-दोडामार्ग नगरपंचायत मासिक सभा बैठकीत उपनगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष यांच्यात खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 05:30 PM2019-11-29T17:30:14+5:302019-11-29T17:33:23+5:30
विकासकामांच्या मुद्यावरूनही गरमागरम चर्चा झाली. विकासकामांची मुदत संपून बराच कालावधी झाला. वर्कआॅर्डरची मुदत संपली. परंतु ठेकेदार कामे करीत नाहीत. यामुळे विकास प्रक्रिया मंदावल्याने ठेकेदारावर काय कारवाई करणार ते सांगा, असे नानचे यांनी विचारले.
दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण व माजी नगराध्यक्ष संतोष नानचे या सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांतच विविध विषयांवरून खडाजंगी झाल्याने नगरपंचायतीची मासिक बैठक चांगलीच वादळी ठरली. सभाशास्त्राला धरून नानचे बोलत नसल्याचा आरोप करीत ह्यतुमच्यावर मी कायद्याच्या अधिकारात कारवाई करू शकतोह्ण, असा इशारा चव्हाण यांनी देताच तुम्ही मला बोलण्यापासून रोखू शकत नाहीत. हिंमत असेल तर कारवाई करून दाखवाचह्ण असे प्रतिआव्हान नानचे यांनी दिल्याने सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला.
कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा लीना कुबल या बैठकीस उपस्थित नसल्याने उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी मुख्याधिकारी वैभव साबळे, शिक्षण व आरोग्य सभापती संतोष म्हावळणकर, बांधकाम सभापती प्रमोद कोळेकर, नगरसेवक संतोष नानचे, राजेश प्रसादी, सुधीर पनवेलकर, दिवाकर गवस, रामचंद्र ठाकूर, नगरसेविका सुषमा मिरकर, साक्षी कोरगावकर, आदिती मणेरीकर, डॉ. वंदना कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी मासिक बैठक लावण्यास का विलंब झाला? याबाबत जाब विचारला. आचारसंहिता संपून बराच कालावधी झाला. परंतु बैठक लावली गेली नाही. वास्तविक ही बैठक आचारसंहिता संपल्यानंतरची दुसरी बैठक असायला हवी होती. अशी टिपणी करीत विलंबामागचे कारण सांगावे, अशी मागणी सभागृहात केली.
त्यावर उपनगराध्यक्ष चव्हाण यांनी याचे उत्तर तुम्हांला नगराध्यक्ष देऊ शकतील. मी देऊ शकत नाही. त्या अनुपस्थित असल्याने या सभेचा मी अध्यक्ष आहे, असे उत्तर दिले.
त्यावर बोलताना नानचे यांनी आपण आपली जबाबदारी टाळत आहात, असा आरोप करीत गतिमान विकास व्हायचा असेल तर बैठका वेळेत व्हायला हव्या. लोकांच्या आमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत, असे सांगितले. या मुद्यावरून दोघांतही चांगलीच खडाजंगी झाली. अखेर मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी बैठक घेण्यास दिरंगाई झाल्याबाबत दिलगिरी व्यक्त करीत, यापुढे काळजी घेतली जाईल असे सांगितल्यावर वादावर पडदा पडला.
शहरातील विकासकामांच्या मुद्यावरूनही गरमागरम चर्चा झाली. विकासकामांची मुदत संपून बराच कालावधी झाला. वर्कआॅर्डरची मुदत संपली. परंतु ठेकेदार कामे करीत नाहीत. यामुळे विकास प्रक्रिया मंदावल्याने ठेकेदारावर काय कारवाई करणार ते सांगा, असे नानचे यांनी विचारले. तर नगरसेवक राजेश प्रसादी यांनी लिंगायत दफनभूमीचे काम वर्कआॅर्डर संपूनही पूर्ण झाले नाही. हे सभागृहाच्या लक्षात आणून देत सर्वात भ्रष्ट ठेकेदार असल्याचा आरोप केला. अशा ठेकेदारास काळ्या यादीत टाका, अशी मागणी मनसेचे नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांनी केली. शहरात प्लास्टिकबंदी करण्याच्या उद्देशाने उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी प्लास्टिक वापरकर्त्यांवर कारवाई करण्याचा इशारा प्रसार माध्यमांच्यामार्फत दिल्याचा मुद्दा नानचे यांनी सभागृहात उपस्थित केला. प्लास्टिकबंदीला आमचा विरोध नाही. पण त्या अगोदर व्यापारी, नागरिक यांची बैठक झाली. त्या बैठकीत जनजागृती करा. कापडी पिशव्या किंवा इतर साहित्य द्या आणि मगच प्लास्टिक बंदीचा निर्णय घ्या, असे सुचविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न करता प्लास्टिक वापरकर्त्यांवर कारवाईची धमकी देणे चुकीचे आहे.
चव्हाण यांनी ह्यतुम्ही सभा शास्त्रानुसार बोलत नसून मला कायद्याचा अधिकार वापरायला लावू नकाह्ण, असे सूचक वक्तव्य केले. त्यावर नानचे यांनी ह्यतुम्ही मला रोखू शकत नाही. तुम्ही कारवाई करून दाखवा असे प्रतिआव्हान दिले. अखेर मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी प्लास्टिकबंदीबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.