बंद प्रकल्पामुळे कोट्यवधींचा चुराडा

By admin | Published: June 7, 2014 12:29 AM2014-06-07T00:29:20+5:302014-06-07T00:29:20+5:30

टाळंबाची व्यथा : कार्यालये, वसाहतींची दुरवस्था, कर्मचाऱ्यांना बिनकामी पगार

Clash of billions due to closed project | बंद प्रकल्पामुळे कोट्यवधींचा चुराडा

बंद प्रकल्पामुळे कोट्यवधींचा चुराडा

Next

विजय पालकर ल्ल माणगाव
सात गावांचे पुनर्वसन करुन पासष्ट गावांना ओलिताखाली आणण्याच्या उद्देशाने पस्तीस वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या टाळंबा प्रकल्पाच्या कार्यालयांची व वसाहतींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रकल्पातील कर्मचाऱ्यांसह कार्यालयांचे व वसाहतींचे पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे. गेले दीड वर्ष बंदावस्थेत असल्याने जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्याचाच हा प्रकार आहे. तसेच बिनकामी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम सुरु असलेल्या ठिकाणी पाठविण्याकडेही वरिष्ठांनी दुर्लक्ष केले आहे.
माणगाव खोरे पाण्याने समृद्ध करण्यासाठी पस्तीस वर्षापूवी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने टाळंबा प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून माणगाव परिसरातील बुडीताखाली येणाऱ्या सात गावांचे पुनर्वसन करण्याचा बेत आखून परिसरातील पासष्ट गावांना मुबलक पाणीसाठा करण्याचा मुख्य उद्देश या प्रकल्पातून साधण्यात येणार होता. मात्र, सद्यस्थिती पाहता या प्रकल्पामुळे शासनाचा म्हणजे जनतेचाच कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
या प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रात येणाऱ्या वसोली, उपवडे, साकीर्डे, आंजिवडे, चाफेली, हळदीचे नेरुर, पुळास या सात गावांच्या पुनर्वसनाबाबतही कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. तसेच या प्रकल्पामुळे गेल्या तीस वर्षात पाण्याचा एक थेंबही साठविण्यात आलेला नाही.
या टाळंबा प्रकल्पासाठी त्यावेळी कार्यालये उभारण्यात आली. लाखो रुपये खर्च करुन गोडावून बांधण्यात आली. मात्र, आजपर्यंत या गोडावूनमध्ये एकही सिमेंटचे पोते उतरविण्यात आलेले नाही. त्यामुळे ही गोडावून का बांधण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कार्यालयांची व कर्मचारी वसाहतींची अवस्थाही आता स्मशानभूमीसमान झाली आहे. कित्येकवर्षे या कार्यालयांच्या व वसाहतींच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे दीड वर्षे बंदावस्थेत असणारा हा प्रकल्प पुन्हा सुरु होणार का? याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.
जवळपास दीड वर्षे टाळंबा प्रकल्पाचे काम बंद आहे. या दीड वर्षाच्या कालावधीत कर्मचाऱ्यांनी शासनाचे केलेले काम आणि त्यांनी पगारापोटी घेतलेला मोबदला याचे समीकरण मांडले तर या प्रकल्पातील छोटे घोटाळे एकत्र केल्यास मोठा घोटाळा निर्माण होऊ शकतो. टाळंबा प्रकल्पातील काही कर्मचारी असेही आहेत ज्यांना काम न करता पगार घेणं कमीपणाचे वाटत आहे. परंतु, त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच आहे. कोकण पाटबंधारे 'विकास' महामंडळ किती भकास असू शकते हे या टाळंबा प्रकल्पाच्या ठिकाणी आल्यास नक्की कळते.

Web Title: Clash of billions due to closed project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.