Sindhudurg: ताज प्रकल्प भूमिपूजनावेळी मंत्र्यांना रोखले, पोलिस-प्रकल्पग्रस्तामध्ये धक्काबुकी
By अनंत खं.जाधव | Published: October 14, 2024 12:08 PM2024-10-14T12:08:55+5:302024-10-14T12:10:50+5:30
सावंतवाडी : शिरोडा वेळागर येथील बहुचर्चित ताज पंचतारांकित प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभासाठी आलेल्या राज्यांच्या पर्यटन मंत्री गिरीश महाजन व शालेय ...
सावंतवाडी : शिरोडा वेळागर येथील बहुचर्चित ताज पंचतारांकित प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभासाठी आलेल्या राज्यांच्या पर्यटन मंत्री गिरीश महाजन व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना प्रकल्पग्रस्तांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी आक्रमक प्रकल्पग्रस्तांनी मंत्र्यांच्या गाड्या अडवून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिस व आंदोलक यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. दरम्यान पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला.
मात्र पर्यटन मंत्री महाजन यांनी आंदोलकांना शांततेचे आव्हान करत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच आम्ही लवकरच आपल्या मागण्यांबाबत विचारात घेऊन त्यावर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले त्यानंतर प्रकल्पग्रस्त शांत झाले. दरम्यान या धक्काबुकीत चार प्रकल्पग्रस्त जखमी झाले असून त्यांना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
शिरोडा वेळागर येथे ताजचा पंचतारांकित हॉटेल प्रकल्प १४० हेक्टर क्षेत्रात होणार आहे. मात्र यातील ३९ सर्व्हे नंबर व अतिरिक्त ९ हेक्टर जमीन यातून वगळा यासाठी प्रकल्पग्रस्त गेली अनेक वर्षे शासनस्तरावर झगडत आहेत. मागील काही महिन्यापासून तर येथील जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार यांच्यासोबत प्रकल्पग्रस्ताच्या विविध बैठका झाल्या. मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यातच या प्रकल्पाचे भूमिपूजन सभारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र हे भूमिपूजन करण्यास आमचा विरोध नाही पण ही जमीन वगळण्यासंदर्भात निर्णय द्या नंतर भूमिपूजन करा असे प्रकल्पग्रस्ताचे म्हणणे होते.
पण या विरोधाला न जुमानता पर्यटन विभागाकडून प्रकल्पांसाठीचे भूमिपूजन काल, रविवारी आयोजित केले होते. यासाठी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे दोघे अधिकाऱ्यांसह शिरोडा वेळागर येथे दाखल झाले. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी जोरदार घोषणाबाजी केली तसेच मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या. मंत्र्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न झाला. यावेळी प्रकल्पग्रस्त व पोलिस यांच्यात जोरदार धक्काबुकी झाली. यात काही प्रकल्पग्रस्त जखमी झाले. पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करताना सौम्य लाठीमार केला. तरीही प्रकल्पग्रस्त आक्रमक होते. जखमी प्रकल्पग्रस्तांना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याच घाईगडबडीत भूमिपूजन सभारंभ उरकून घेण्यात आला. त्यानंतर मंत्री दीपक केसरकर हे पोलिस बंदोबस्तात घटनास्थळावरून निघून गेले. तर मंत्री महाजन यांनी प्रकल्पग्रस्ताशी चर्चा केली आणि यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रकल्पग्रस्त शांत झाले.