दोन परीक्षा केंद्रांवर दहावीच्या ४५० प्रश्नपत्रिका अपुऱ्या
By Admin | Published: March 6, 2015 12:05 AM2015-03-06T00:05:54+5:302015-03-06T00:09:34+5:30
परीक्षेची वेळ बदलली : कोकण बोर्डाचा सावळागोंधळ; चिपळुणात २५०, अलोरेत २०० प्रश्नपत्रिका पडल्या कमी
चिपळूण : तालुक्यातील युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण व न्यू इंग्लिश स्कूल अलोरे या दोन केंद्रांवर दहावीच्या परीक्षेसाठी गुरुवारी संयुक्त हिंदीच्या ४५० प्रश्नपत्रिका कमी पडल्याने शिक्षण विभागाची तारांबळ उडाली. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आणि काही काळातच प्रश्नपत्रिकांच्या कडेकोट बंदोबस्तात झेरॉक्स काढून त्या परीक्षा केंद्रावर पोहोचविण्यात आल्या. अखेर दुपारी १२.४५ वाजता पेपर सुरू झाला.
दहावीची परीक्षा दि. ३ मार्च पासून सुरू झाली आहे. चिपळूण शिक्षण विभागाअंतर्गत पाच हजार ५५६ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. युनायटेड इंग्लिश स्कूल केंद्र क्र. ६२०४ येथे ९४६ विद्यार्थी परीक्षेला बसले असून, त्यातील २५० विद्यार्थ्यांनी संयुक्त हिंदी विषय घेतला आहे. उर्वरित विद्यार्थी संपूर्ण हिंदीसाठी बसले आहेत. अलोरे केंद्र क्र. ६२०१ या केंद्रावर २२३ विद्यार्थी हिंदी संयुक्त, तर १५७ विद्यार्थी हिंदी संपूर्ण विषयाची परीक्षा देत होते.
संयुक्त हिंदीचे विद्यार्थी ४७३ असतानाही त्यासाठीच्या गठ्ठ्यात केवळ ५०च पेपर बोर्डाकडून पाठविण्यात आले होते. सकाळी १०.१५ वाजता परिरक्षक मोहिते, उपपरिरक्षक एम. बी. पाटील, युनायटेडचे मुख्याध्यापक के. पी. शिंदे यांच्या ही बाब निदर्शनास येताच मोहिते यांनी कोकण बोर्डाचे सचिव आर. बी. गिरी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. कोकण बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढण्याचा निर्णय झाला, परंतु दोन-तीन ठिकाणी प्रयत्न करूनही कोणी झेरॉक्स काढून देण्यास तयार होत नव्हते. अखेर बाजारपेठेतील एका कॉम्प्लेक्समधील झेरॉक्स मालकाने प्रसंगावधान राखून सहकार्य केले. तेथे शूटिंग करण्यात आले व पोलीस बंदोबस्तात झाडाझडती करून कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतर प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स काढण्याचे काम सुरू झाले. १२ वाजता २०० प्रश्नपत्रिका अलोरे केंद्रावर पोलीस बंदोबस्तात पाठविण्यात आल्या. त्यानंतर २५० प्रश्नपत्रिका युनायटेड इंग्लिश स्कूलसाठी देण्यात आल्या. दुपारी १२.४५ वाजता दोन्ही केंद्रांवर परीक्षा सुरळीत सुरू झाली. ११ वाजता संबंधित विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुखांनी सूचना दिल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली असली, तरी परीक्षा प्रक्रिया शांततेत पार पडली. झेरॉक्स प्रती करताना माध्यमिक शिक्षणाधिकारी अहिरे, गटशिक्षणाधिकारी मोहिते, नायब तहसीलदार टी. एस. शेजाळ, पुरवठा अधिकारी केतन आवले, सहायक पोलीस निरीक्षक इंगोले, महिला पोलीस अधिकारी जाधव, प्रकल्प अधिकारी एस. एस. सावंत यांच्यासह पोलीस कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. प्रश्नपत्रिकांच्या बंदोबस्तातच त्या केंद्रावर पोहोचविण्यात आल्या. (प्रतिनिधी)