अगोदर भाजपमधील भ्रष्टाचार साफ करा?
By admin | Published: January 6, 2017 11:00 PM2017-01-06T23:00:16+5:302017-01-06T23:00:16+5:30
नारायण राणे : नोटाबंदीविरोधात काँग्रेसचे धरणे
सिंधुदुर्गनगरी : काळा पैसा व भ्रष्टाचार संपविण्यासाठी नोटाबंदी आवश्यक म्हणणाऱ्या सरकारने अगोदर भाजपमधील भ्रष्टाचार साफ करावा, असे खुले आव्हान माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असून, सर्वच ठिकाणी मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. जनतेवर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी पक्ष आदेशाची वाट न पाहता थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करा, अशा सूचना राणे यांनी कार्यकर्त्यांना देत शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
नोटाबंदीमुळे देशात वाढत जाणारी महागाई आणि जिल्ह्याचा ठप्प झालेला विकास याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडले. यावेळी आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, संदेश सावंत, मधुसूदन बांदिवडेकर, दीपलक्ष्मी पडते, डॉ. जयेंद्र परुळेकर, अस्मिता बांदेकर, मेघा गांगण यांच्यासह जिल्हा तालुका काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे निवेदन सादर केले व जिल्हा काँग्रेसच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी हे निवेदन शासनस्तरावर पाठविले जाईल, असे स्पष्ट केले. धरणे आंदोलनाचा समारोप दुपारी ३.३० वाजता झाला. (प्रतिनिधी)
उपासमर म्हणजे क्रांती म्हणायची का?
नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात ८६ टक्के म्हणजेच १४ लाख ५० हजार कोटी रुपयांचे चलन एकाचवेळी रद्द झाले. ४५ कोटी जनतेला याचा फटका बसला. महागाईने उचांक काढला. उपासमार म्हणजेच क्रांती म्हणायची का? देशातील ४८ टक्के लोकांना बँकेची ओळखच नाही. अशा परिस्थितीत डिजिटल इंडियाची देण्यात आलेली हाक हास्यास्पद असल्याच्या भाषेत केंद्र सरकारची खिल्ली नारायण राणे यांनी उडविली.
अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरा
नोटाबंदीच्या विरोधात छेडलेले आजचे आंदोलन हे एका दिवसापुरते मर्यादित ठेवायचे नाही. ज्या-ज्या ठिकाणी अन्यायकारक परिस्थिती दिसेल तेथे तेथे स्वतंत्रपणे पक्ष आदेशाची वाट न पाहता रस्त्यावर उतरून आंदोलने छेडावीत, असे आवाहनही आमदार नारायण राणे यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले. लोकशाही मार्गाने होणारी आंदोलने सरकार किंवा पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न करू नये. काँग्रेस कदापि गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्याच्या विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास पालकमंत्री दीपक केसरकर असमर्थ ठरत असल्याचे सांगून त्यांचा जिल्ह्याच्या विकासाबाबतचा अभ्यास कमी असल्याचा आरोप केला.
तिरंगी भजनबारीने आंदोलनात रंग
शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता नोटाबंदी विरोधात भजनाने आंदोलनाला सुरुवात झाली. सुमारे तासभर तिरंगी भजनीबारीने धरणे आंदोलनात रंग भरला. भजनीबुवा संतोष कानडे, प्रकाश पारकर व गुंडू सावंत यांनी ‘पैसा ठरवला खोटा, काम मिळेना बंद करून नोटा’ असा सवाल भजनी ठेका गाण्यावर करीत आंदोलनकर्त्यांना खिळवून ठेवले.