दोन ट्रॅक्टर भरून प्लास्टिक गोळा, विद्यार्थ्यांनी राबविली स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 02:32 PM2019-10-07T14:32:00+5:302019-10-07T14:34:10+5:30
प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने कणकवली येथील विद्यामंदिर प्रशालेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे दोन ट्रॅक्टर म्हणजे जवळपास ७० ते ८० किलो एवढे प्लास्टिक गोळा करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही सहभाग घेतला.
कणकवली : प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने कणकवली येथील विद्यामंदिर प्रशालेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे दोन ट्रॅक्टर म्हणजे जवळपास ७० ते ८० किलो एवढे प्लास्टिक गोळा करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही सहभाग घेतला.
२ आॅक्टोबरपासून संपूर्ण देशभरात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. संपूर्ण देशभरात होत असलेल्या प्लास्टिकच्या महापुरापासून, प्रदूषणापासून देशाला सोडविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या कार्यक्रमात सहभाग म्हणून कणकवली विद्यामंदिरने हा उपक्रम राबविला. तसेच प्रशालेतील सेवायोजनेच्या तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातील पहिला टप्पा म्हणून आपले घर व घराच्या आसपासच्या परिसरातील प्लास्टिक गोळा करून परिसर स्वच्छ केला.
यावेळी महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग, पुणे या विभागांतर्गत पर्यावरण सेवा योजना या विभागाच्या राज्य समन्वयक सुप्रिया निशाणदार यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिकची उत्पत्ती व त्याचे वाढते प्रमाण याविषयी चित्रफितीद्वारे माहिती दिली. तसेच देशाला प्लास्टिकमुक्त करण्याकरिता आपला हातभार लावावा. त्यासाठी विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले.
या उपक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक बी. डी. सरवदे, पर्यवेक्षक पी. जे. कांबळे, वनपाल किशोर जंगले, वनरक्षक रुपाली पाटील, स्वच्छता को-आॅर्डिनेटर हर्षदा सावंत, मनोज धुमाळे, अमोल शेळके, सुनिता वारघडे, विद्या शिरसाट, अच्युत वणवे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांचे योजनाप्रमुख राणे यांनी अभिनंदन केले.