ग्लोबल मालवणीकडून किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 04:15 PM2017-10-25T16:15:16+5:302017-10-25T16:21:46+5:30
मालवणच्या ऐतिहासिक रामेश्वर-नारायण पालखी उत्सवाचे औचित्य साधून ग्लोबल मालवणी या संस्थेने दांडी येथील ऐतिहासिक मोरयाचा धोंडा देवस्थान ते दांडेश्वर मंदिर किनारपट्टीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविली. यामध्ये जवळपास चार टन कचरा गोळा करण्यात आला. विशेष म्हणजे यातील पालापाचोळा, लाकडे आदी प्रकारचा बहुतांश कुजणारा कचरा समुद्रकिनारी खड्डा खोदून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. प्लास्टिक, काच व रबरयुक्त कचरा वेगळा गोळा करण्यात आला.
मालवण,दि. २५ : मालवणच्या ऐतिहासिक रामेश्वर-नारायण पालखी उत्सवाचे औचित्य साधून ग्लोबल मालवणी या संस्थेने दांडी येथील ऐतिहासिक मोरयाचा धोंडा देवस्थान ते दांडेश्वर मंदिर किनारपट्टीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविली. यामध्ये जवळपास चार टन कचरा गोळा करण्यात आला.
विशेष म्हणजे यातील पालापाचोळा, लाकडे आदी प्रकारचा बहुतांश कुजणारा कचरा समुद्रकिनारी खड्डा खोदून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. प्लास्टिक, काच व रबरयुक्त कचरा वेगळा गोळा करण्यात आला.या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ मोरयाचा धोंडा देवस्थान येथून करण्यात आला.
यावेळी आपल्या निवासस्थानी अंगणातील कचऱ्यापासून खत निर्मिती करणाऱ्या दांडी येथील जॉर्जी डिसोजा यांचा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती आप्पा लुडबे, नगरसेवक पंकज सादये, नगरसेविका सेजल परब, तृप्ती मयेकर उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, संत गाडगे महाराज परीट समाजसेवा संघ, गणेश येशू मंडळ गवंडीवाडा तसेच आतू फर्नांडिस, स्थानिक नागरिक आबा चांदेरकर, दीपक जोशी, विश्वनाथ कुमठेकर आदींनी या उपक्रमात मोलाचे सहकार्य केले.
पालापाचोळा, भाज्यांचा व फळांचा टाकाऊ भाग व अन्य कुजणारा कचरा हा कचरा नसून ते सोनेच आहे. अशाप्रकारच्या कचऱ्याद्वारे सेंद्रिय खत निर्मिती करण्यात येते. हा विचार या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून रुजविण्याचे काम ग्लोबल मालवणीने केले.
सगळा कचरा पालिकेने गोळा करून डंपिंग ग्राऊंडला जमा करावा हा चुकीचा पायंडा बदलण्यासाठी ग्लोबल मालवणीने राबविलेल्या मोहिमेचे कौतुक करण्यात आले. ग्लोबल मालवणीने समुद्रकिनारी दोन खड्डे खोदले होते. त्यामध्ये वाहून आलेली छोटी लाकडे जमा करण्यात आले.
नागरिकांनी अशाच प्रकारे आपल्या राहत्या घराच्या शेजारी खड्डा खोदून कुजणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी किंवा त्याचे खत बनवावे, असे आवाहन ग्लोबल मालवणीकडून करण्यात आले. प्लास्टिक कचरा वेगळा गोळा करण्यात आला. तसेच मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व काचेच्या बाटल्याही गोळा करण्यात आल्या. प्लास्टिक कचरा भंगारवाल्याला देण्याचे ठरविण्यात आले. काही प्लास्टिक बाटल्यांपासून देखावे बनवून पालखी सोहळ्यादिवशी काही स्वच्छतापर संदेशही देण्यात आले.
मोलाचे मार्गदर्शन
ग्लोबल मालवणी संस्थेच्यावतीने या उपक्रमाची जबाबदारी संस्थेचे सदस्य विजय पांचाळ आणि बबलू आचरेकर यांनी सांभाळली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संस्थेचे सदस्य विक्रम जाधव यांनी करून सहकार्य केले. तसेच हा उपक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी नगरपालिकेचे स्वच्छता दूत महेंद्र पराडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेचे सचिव निलेश वालकर आणि उपाध्यक्ष बंटी केरकर यांनी उपक्रमाला सहकार्य करून सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.