सिंधुदुर्ग किल्ला घेणार मोकळा श्वास, केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून स्वच्छता अभियान सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 12:04 PM2023-10-14T12:04:41+5:302023-10-14T12:06:50+5:30
छत्रपतींच्या हाता-पायांचे ठसे आणि एकमेव मंदिर
संदीप बोडवे
मालवण : केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विजयदुर्ग उपमंडळाच्या अंतर्गत सिंधुदुर्ग किल्ल्यावर २ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विशेष स्वच्छता अभियान ३.० राबविण्यात येत आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक दुर्गमित्रांच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
स्वच्छता अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीवरील झाडी - झुडपे साफ करण्यात आली आहेत. आता अंतर्गत साफसफाईच्या कामाला सुरुवात झाली असून, यानिमित्ताने लवकरच सिंधुदुर्ग किल्ला मोकळा श्वास घेणार असल्याने दुर्गप्रेमींकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग किल्ला कात टाकणार..
हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख ठाणे असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः जातीनिशी लक्ष देऊन बांधलेल्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. लवकरच मालवण येथे होणाऱ्या नौसेना दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ला आणि त्यांचे आरमारी महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीच्या कामात केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने लक्ष घातले आहे. यामुळे भविष्यात सिंधुदुर्ग किल्ला कात टाकणार आहे.
पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष
स्वच्छता अभियानामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याचा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर होणार आहे. त्यामुळे स्वच्छताचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाचे अधीक्षक पुरातत्व विद डॉ. शुभ मजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले सफाईचे काम सुरू आहे.
तटबंदी झाली मोकळी
पावसाळ्यात किल्ल्याच्या तटबंदीवर मोठ्या प्रमाणात झाडीझुडपी वाढली होती. तटबंदीवरील झाडी तोडून साफ करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संरक्षण भिंतीवरील जंगली झाडे व गवत काढण्यासोबत किल्ल्याचा परिसर स्वच्छ करण्यास आता सुरुवात करण्यात आली आहे.
छत्रपतींच्या हाता-पायांचे ठसे आणि एकमेव मंदिर
सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाता-पायांचे ठसे संग्रहित करण्यात आले आहेत. भारतातील एकमेव असे खुद्द राजाराम महाराजांनी बांधलेले छत्रपतींचे मंदिर याच किल्ल्यात आहे. किल्ल्याच्या तटबंदीची लांबी ३ किलोमीटर आणि २७ बुरुज आहेत. किल्ल्याचे क्षेत्रफळ ४८ एकर आहे. किल्ल्यावर ३ तलाव, ३ विहिरी आणि ६ मंदिरे आहेत.