बाजारपेठेतील मटक्याचे अड्डे बंद करा, तरूण पिढी गुरफटतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 04:59 PM2020-01-02T16:59:21+5:302020-01-02T17:01:14+5:30
बाजारपेठेतील शासकीय गोदामासमोर चालणाऱ्या मटका व्यवसायाविरोधात शहरातील गोपाळनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष निकम यांनी आवाज उठविला आहे. राजरोस चाललेल्या मटक्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याने शहरातील मटक्याच्या अड्ड्यांवर तातडीने कारवाई करून ते कायमस्वरुपी बंद करावेत, अशी मागणी निकम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
वैभववाडी : बाजारपेठेतील शासकीय गोदामासमोर चालणाऱ्या मटका व्यवसायाविरोधात शहरातील गोपाळनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष निकम यांनी आवाज उठविला आहे. राजरोस चाललेल्या मटक्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याने शहरातील मटक्याच्या अड्ड्यांवर तातडीने कारवाई करून ते कायमस्वरुपी बंद करावेत, अशी मागणी निकम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
वैभववाडी बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शासकीय गोदामासमोर मुख्य रस्त्यालगत मटका व्यवसाय तेजीत चालला आहे. या मटक्यात लहान मुले, तरुण ते अगदी वयोवृध्द गुरफटले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. मटक्याच्या नादी लागलेली शाळकरी मुले व बेकार तरुण पैशासाठी घरात भांडणे करीत असल्याने अनेकांचे कौटुंबीक स्वास्थ्य बिघडत चालले आहे.
परंतु, अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त करणाऱ्या मटक्यांच्या अड्ड्यांत दिवसेदिंवस वाढ होत आहे. त्यामुळे शहरात वाढत असलेले मटका अड्डे तत्काळ बंद करण्यात यावेत. हे सर्व अड्डे मुख्य रस्त्यालगत असल्यामुळे महिलांना शहरातून फेरफटका मारताना या मटका अड्ड्यांचा नाहक मनस्ताप होत आहे.
त्यामुळे बाजारपेठेतील मटका व्यवसायावर कारवाई करून तो कायमस्वरुपी बंद करावा, असे निकम यांनी निवेदनात म्हटले आहे. अशा प्रकारच्या अवैध व्यवसायामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. त्यामुळे यावर निर्बंध घालणे आवश्यक बनले आहे. तशी मागणीही होत आहे.
खुलेआम मटक्यावर कारवाई का नाही ?
शहरात जागोजागी खुलेआम मटका सुरू असल्याचे नागरिकांच्या नजरेस पडते. किंबहुना ही पोलिसांनाही माहिती आहे. विशेष म्हणजे काही तरुण याकडे मिळकतीचे साधन म्हणून अधिकाधिक गुरफटताना दिसून येत आहे. तरीही सर्वश्रृत असलेल्या मटक्याच्या अवैध व्यवसायावर पोलीस कारवाई नेमकी कशामुळे करीत नसावेत? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सतत घोळत आहे.