चर्चेचे गुऱ्हाळ बंद करा, ठोस उपाय करा

By admin | Published: March 15, 2017 11:11 PM2017-03-15T23:11:13+5:302017-03-15T23:11:13+5:30

बांदा ग्रामस्थ आक्रमक : प्रशासनातर्फे आढावा बैठक, प्रांताधिकाऱ्यांसह तहसीलदारांचे मार्गदर्शन

Close discussions, make concrete solutions | चर्चेचे गुऱ्हाळ बंद करा, ठोस उपाय करा

चर्चेचे गुऱ्हाळ बंद करा, ठोस उपाय करा

Next



बांदा : पशुधन विभागाचे प्रतिनिधी या माकडतापाबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करीत असता ग्रामस्थांनी हे चर्चेचे गुऱ्हाळ बंद करा आणि ठोस उपाय करा अशी मागणी केली. ग्रामस्थांची जेवढी उपस्थिती सभागृहात होती तेवढेच ग्रामस्थ बाहेर उभे होते. त्यामुळे अधिकाऱ्यांची सारवासारव ऐकून सर्वच ग्रामस्थ संतप्त झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
यावेळी तहसीलदार सतीश कदम यांनी तुमचे म्हणणे आम्ही ऐकले ना, आता आम्हाला बोलू द्या असे चढ्या आवाजात सांगताच ग्रामस्थ आणखीनच आक्रमक झाले. तुम्ही मोठ्या आवाजात बोलू नका, आमची माणसे मृत झालीत त्याचं दु:ख तुम्हाला काय कळणार, आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका, आमच्या भावनांशी खेळण्याचे थांबवा अन्यथा येथून कोणालाही परत जाऊ देणार नसल्याचे सांगताच परिस्थिती गंभीर बनली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत प्रांताधिकारी इनामदार यांनी ग्रामस्थांना शांत करीत योग्य ते नियोजन करीत बुधवारपासून युद्धपातळीवर मोहीम राबवू अशी ग्वाही देत ग्रामस्थांच्या मागण्या मांडण्यास सांगितल्याने परिस्थिती निवळली.
सटमटवाडी येथे माकडतापाने आतापर्यंत चौघांचा बळी घेतला आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्ह्यातील यंत्रणा खडबडून जागी झाली. मात्र, नियोजनाचा योग्य ताळमेळ नसल्याने अजूनही या माकडतापावर नियंत्रण मिळवू शकले नाही, असा आरोप सटमटवाडी ग्रामस्थांनी बांदा येथे आयोजित आढावा बैठकीत केला. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या सूचनेनुसार आढावा बैठक घेऊन केलेल्या नियोजनाची माहिती देण्यासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार सतीश कदम, उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक, वनक्षेत्रपाल विजय कदम, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अश्विनी जंगम, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पाटील उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण देताना अधिकाऱ्यांची भंबेरी उडत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते.
दिवसेंदिवस बांदा आणि परिसरात माकडतापाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. साथ नियंत्रण अधिकारी डॉ.अश्विनी जंगम यांनी येथील घरात आत व बाहेर औषध फवारणी करूया जेणेकरून घराच्या भिंतीतील भेगांमध्ये मादी विषाणू अंडी घालू शकणार नाहीत. या फवारणीमुळे लोकांच्या आरोग्याला कोणताही धोका उद्भवणार नाही याची ग्वाहीही त्यांनी देताच ग्रामस्थांनी फवारणी करण्यास संमती दिली. जीवबा वीर यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करताना माकडताप बाधित रुग्णांना पुढील उपचारासाठी गोव्यात १०८ रुग्णवाहिकेतून नेले जाते, मात्र एखादा रुग्ण दगावल्यास त्याला या ठिकाणी परत आणण्यास खाजगी वाहन भाड्याने घ्यावे लागते. यासाठी चार ते पाच हजार रुपये मोजावे लागतात. यासाठी प्रशासनाने या ठिकाणी कायम स्वरूपी रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. तर सचिन वीर यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी एक डॉक्टर व परिचारिका ठेवावी अशी मागणी केली. यावर प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी आपल्या सर्व मागण्या रास्त असून या मागण्यांचा प्रस्ताव आम्ही वरिष्ठ पातळीवर पाठवतो असे सांगत माकडांना मारण्यासाठीचा प्रस्ताव पाठवून त्याला त्वरीत मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो असे आश्वासन दिले.
तर या ठिकाणी कायमस्वरूपी रात्रीच्या वेळी एक डॉक्टर व परिचारिका नेमण्यात येईल असे आश्वासन डॉ.पाटील यांनी दिले. सटमटवाडी परिसरातील सर्व भागात औषध फवारणीसाठी पंप व ज्यादा मनुष्यबळ मागविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Close discussions, make concrete solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.