जलतरण तलावांतील सायंकाळची बॅच बंद
By admin | Published: October 21, 2015 10:29 PM2015-10-21T22:29:53+5:302015-10-21T22:44:29+5:30
पाणीकपातीचा परिणाम : महापालिकेने घेतला निर्णय
नाशिक : गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन महानगरपालिकेने दि. ९ आॅक्टोबरपासून पाणीकपात घोषित केल्यानंतर शहरातील मनपाच्या मालकीच्या पाचही जलतरण तलावांतील पाणीबचतीसाठी सायंकाळची बॅच बंद करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांनी दिली.
पावसाने दिलेली ओढ आणि गंगापूर धरणात ७० टक्के पाणीसाठा लक्षात घेऊन भविष्यात पाणीसंकट ओढवू नये, यासाठी महानगरपालिकेने सावधानता बाळगत दि. ९ आॅक्टोबरपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यासाठी पाणीपुरवठ्याचे विभागनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. पाणीकपातीच्या घोषणेप्रसंगीच महापौरांनी शहरातील वॉटरपार्क, जलतरण तलाव यांचा पाणीपुरवठाही बंद करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, दि. १३ आॅक्टोबरपासून शहरातील मनपाच्या मालकीच्या पाचही जलतरण तलावांमध्ये पाणीबचतीचे धोरण अवलंबिले जात असून, केवळ सकाळची बॅच सुरू ठेवत सायंकाळची बॅच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात त्र्यंबकरोडवरील वीर सावरकर जलतरण तलावासह नाशिकरोड, सिडको, सातपूर आणि पंचवटी याठिकाणी महापालिकेचे जलतरण तलाव आहेत. पाचही जलतरण तलावमिळून सुमारे एक लाख लिटर्स पाणी लागते. याशिवाय जलतरण तलावांमध्ये शॉवर्सचीही व्यवस्था आहे. सुमारे पाच हजार सभासद असून, सकाळ-सायंकाळ बॅचेस चालतात. पाणीकपातीच्या धोरणामुळे आता केवळ सकाळची बॅच सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यू. बी. पवार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
सराव : राज्य-राष्ट्रीय खेळाडूंची मागणी
महापालिकेने पाणीकपातीमुळे सायंकाळची बॅच बंद केल्याने विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सरावावर परिणाम झाला आहे. बव्हंशी खेळाडू हे सायंकाळी ७ ते ८ या वेळेत सरावासाठी जलतरण तलावांवर येत असतात. मोजक्या संख्येने असलेल्या या खेळाडूंच्या सरावात खंड पडू नये यासाठी त्यांच्यासाठी सायंकाळी जलतरण तलाव खुले ठेवण्याची मागणी संबंधित खेळाडूंनी महापालिकेकडे केली आहे. या खेळाडूंच्या मागणीवर विचार सुरू असल्याची माहिती यू. बी. पवार यांनी दिली.