Sindhudurg Crime: कलमठमध्ये चोरट्यांनी बंद बंगले फोडले, परिसरात भीतीचे वातावरण
By सुधीर राणे | Published: February 24, 2023 12:44 PM2023-02-24T12:44:00+5:302023-02-24T12:44:34+5:30
घरफोडीमुळे मात्र परिसरात भितीचे वातावरण
कणकवली: तालुक्यातील कलमठ बिडयेवाडी येथील चार बंद बंगले चोरट्यांनी फोडले. ही घटना काल, गुरुवारी रात्री उघडकीस आली. दरम्यान चारही बंगले बंदस्थितीमधील असून त्यांचे मालक बाहेरगावी असतात. त्यामुळे चोरीस गेलेला नेमका मुद्देमाल समजू शकलेला नाही. या घरफोडीमुळे मात्र परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
त्या परिसरातील एका बंगल्याची देखभाल करणारी व्यक्ती बंगल्याकडे गेली असता या घरफोड्या उघडकीस आल्या. चोरट्यांनी बंगल्यांच्या प्रवेशद्वारासह मुख्य दरवाजाची कुलपे तोडून आत प्रवेश केला. बंगल्यांमधील कपाटे व अन्य सामान अस्ताव्यस्त स्थितीत दिसत होते.
घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे, उपनिरीक्षक व्ही. एम. चव्हाण, हवालदार राजेंद्र नानचे, पोलिस शिपाई किरण कदम यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. तसेच बंगल्यांच्या मालकांशीही संपर्क साधला. ते मालक आज कलमठ येथे दाखल होणार असून त्यानंतरच चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत माहिती समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले.