सिंधुदुर्गात ढगफुटीसदृश पाऊस; कुडाळची भंगसाळ नदीचे पाणी आले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2022 06:05 PM2022-09-11T18:05:58+5:302022-09-11T18:10:01+5:30
कुडाळ शहराच्या बाजूनं वाहणाऱ्या भंगसाळ नदीला पूर आला असून नागरिकांच्या घरातही पाणी घुसले.
सिंधुदुर्ग- काल संध्याकाळपासून सुरु झालेल्या दमदार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपले. जिल्ह्यात सर्वच नद्यांना पूर आला. सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. मध्यरात्री १ नंतर तुफान पाऊस, कुडाळ शहरातील गुलमोहोर हॉटेलनजीक पाणी रस्त्यावर आले. तसेच शहरातील वाहतूक अन्य मार्गाने वळविली पावसाची तुफान बॅटिंग आजही कायम राहण्याची शक्यता आहे.
कुडाळ शहराच्या बाजूनं वाहणाऱ्या भंगसाळ नदीला पूर आला असून नागरिकांच्या घरातही पाणी घुसले. तर कुडाळ गुलमोहोर हॉटेल ते नवीन एसटी स्टॅन्ड हा मार्ग पाणी आल्याने बंद झाला. काल संध्याकाळपासून सिंधुदुर्गात जोरदार पाऊस सुरु असून रात्री १ पासून या पावसानं नॉनस्टॉप बॅटिंग सुरु केली. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला असून भातशेती पाण्याखाली गेली.
हातेरी, पीठढवळ, निर्मला, गडनदी, सुख नदी, तेरेखोल नद्यांची पातळी वाढली असून नजीकच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कुडाळ शहरानजीक असलेल्या भंगसाळ नदीचे पाणी काळप नाका परिसरात घुसल्याने येथील भंगारविक्रत्यांच्या घरात पाणी घुसले. यामुळे त्यांचे भंगार सामान वाहून गेले.