मालवणात ढगफुटीसदृश पाऊस; डोंगर खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:11 AM2018-06-22T00:11:50+5:302018-06-22T00:11:50+5:30

Cloudy with cloudy weather; The hill collapses | मालवणात ढगफुटीसदृश पाऊस; डोंगर खचला

मालवणात ढगफुटीसदृश पाऊस; डोंगर खचला

Next


सिंधुदुर्ग/मुंबई : कोकण किनारपट्टीवर सक्रिय झालेला मान्सून बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही संततधार बरसत आहे. मालवणात तर तो ढगफुटीसदृश कोसळला. यामुळे शहरासह लगतच्या गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी घुसल्याने अनेकांचे संसार पाण्यावर तरंगत होते. शहरातील एका भंगार व्यावसायिकांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून घर जमिनदोस्त झाले. यात चारजण जखमी झाले. यातील एकजण गंभीर आहे. तालुक्यातील देवली येथे डोंगर खचला आहे.
दरम्यान, सलग कोसळणाºया पावसामुळे दलदलयुक्त जमीन होऊन अनेक ठिकाणी झाडे उन्मळून कोसळत आहेत. मालवणात आठवडाभरात दुसºयांदा ३४५ मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस पडला असून, आतापर्यंत १५२६ मिलीमीटर पावसाची नोंद तहसीलदार कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळपासून पावसाने रौद्ररूप धारण केल्याने मालवण तालुक्यातील खालची देवली येथील कुलस्वामिनी मंदिरानजीक डोंगर खचला. यात डोंगराची माती देवली मार्गावरील रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती.
मालवण शहरातील बांगीवाडा परिसरात भंगार व्यावसायिक राफातुल्ला खान यांच्या घरात गेली अनेक वर्षे भंगार व्यावसायिक राहतात. बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ९ जण झोपण्याच्या तयारीत असताना झाड घरावरच कोसळले. लगेच सर्व सदस्यांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र, घराचे छप्पर अंगावर कोसळून इम्रान खान यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर अंगद शर्मा, रामराज शर्मा, आबीद अली व एक छोटा मुलगा इरशाद खान यांना दुखापत झाली. मध्यरात्री भर पावसात जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. घर कोसळून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील मायणे, खडपेवाडी येथील अनुसया चिपकर यांच्या घराभोवती पाणी साचल्याने त्यांना स्थलांतराची नोटीस देण्यात आली आहे. वडखोल कॅम्प वेंगुर्ला येथील कृष्णा सावंत यांच्या घरावर दरडीचा दगड कोसळून घराची पडवी, शौचालय व बाथरुमचे नुकसान झाले. तर तुळस येथील संतोष घोगळ यांच्या घरावर चिंचेचे झाड कोसळल्याने सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
निवती येथे नऊजणांना वाचविले
कोचरा निवती येथे घराला पुराच्या पाण्याने वेढल्याने ९ माणसे अडकली होती. वेंगुर्ले तहसीलदार, तालुक्यातील शोध व बचाव गट आणि स्थानिक मच्छिमारांच्या सहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही माणसे केरकर कुटुंबातील असून त्यांना तेथीलच कोचरेकर यांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे. हे बचावकार्य २१ जून रोजी मध्यरात्री बारा ते पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होते, अशी माहिती जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत देण्यात आली.
खवणेत नऊ घरांमध्ये ओहोळाचे पाणी
वेंगुर्ले तालुक्यातील खवणे येथील गाबीतवाडा येथे ९ घरांमध्ये ओहोळाचे पाणी शिरून घरातील भांडी वाहून गेली. तसेच घरातील अन्नधान्य भिजून सुमारे ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले. रामा गुणकर यांची भिंत कोसळून सुमारे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. म्हापण-निवती रस्ता येथील पूल खचून रस्त्याचे नुकसान झाले आहे.

Web Title: Cloudy with cloudy weather; The hill collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.