Chipi Airport Inauguration: आजचा क्षण आदळआपट करण्याचा नाही... सौभाग्याचा; राणेंना टोले मारत उद्धव ठाकरेंकडून चिपी विमानतळाचं लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 02:45 PM2021-10-09T14:45:03+5:302021-10-09T14:45:49+5:30

Chipi Airport Inauguration: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला.

cm uddhav thackeray inauguration chipi airport and taunts narayan rane over politics | Chipi Airport Inauguration: आजचा क्षण आदळआपट करण्याचा नाही... सौभाग्याचा; राणेंना टोले मारत उद्धव ठाकरेंकडून चिपी विमानतळाचं लोकार्पण

Chipi Airport Inauguration: आजचा क्षण आदळआपट करण्याचा नाही... सौभाग्याचा; राणेंना टोले मारत उद्धव ठाकरेंकडून चिपी विमानतळाचं लोकार्पण

Next

सिंधुदुर्ग: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीमंत्री नारायण राणे, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही, तर आनंद व्यक्त करण्याचा आहे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी विमानतळाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. (CM Uddhav Thackeray In Chipi Airport Inauguration Programme)

आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नसून तो आनंद व्यक्त करण्याचा क्षण आहे. आजचा दिवस माझ्यासाठी सौभाग्याचा आहे. विमानतळ व्हायला इतकी वर्ष का लागली, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. आपले कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे, ते आपण जगासमोर नेत आहोत. जगातून अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे. त्या सुविधांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा विमानतळ असतो. आपण गोव्याचा विरोधात नाही. पण आपले वैभव कमी नाही. उलट आपण काकणभर सरस आहोत. शिवसेना आणि कोकणाचे नाते वेगळे सांगायला नको, असे नमूद करत चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय करण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

तळमळीने बोलणं आणि मळमळीन बोलणं वेगळं

कोकणचा कॅलिफोर्निया करू असे अनेक जण म्हणाले होते. पाठांतर करून बोलणे वेगळे आणि आत्मसात करून तळमळीने बोलणे वेगळे आणि मळमळीने बोलणे आणखी वेगळे असते, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना लगावला आहे. प्रामाणिकपणे सांगतो, गेल्या दोन वर्षात एक कोरोना बोकांडी बसला आहेच. पण काहीवेळा केंद्रीय मंत्र्यांशी बोलावे लागते. अनेकदा असे जाणवते की, हे बोलणे कोरडे असते. पण ज्योतिरादित्य ही अशी व्यक्ती आहे की, त्यांनी स्वत:हून बैठकीची वेळ मागितली. काही बोलण्याआधी ज्योतिरादित्य अधिक तळमळीने बोलत होते. असे वाटले मी केंद्रीय मंत्री आहेत आणि ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दोघांची नाळ या मातीशी जोडली आहे. इथे राजकारण येणार नाही. ज्योतिरादित्य शिंदे केंद्रीयमंत्री असूनही त्यांची राज्यातील विमानतळांसंदर्भातील तळमळ दिसून आली. आपुलकीने विचापूर केली, असे नमूद करत ज्योतिरादित्य शिंदे मराठी मातीचा संस्कार विसरले नाहीत, याबाबत तुमचे अभिनंदन, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना काढले. 

विनायक राऊत हे निवडून आलेले खासदार आहेत

कोकणची जनता मर्द आहे आणि हक्काचा माणूस म्हणून विनायक राऊत यांना खासदार केले आहे. विनायक राऊत हे जनतेने निवडून दिलेले खासदार आहे, असा खोचक टोला लगावत सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाहीतर कुणीतरी म्हणेल मीच बांधला, असा चिमटाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढला. आजचा कार्यक्रम कोकणसाठी महत्त्वाचा आहे. सगळे मिळून काम करु. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे आले आहेत. आजपर्यंत जे खड्डे मग ते कारभाराचे किंवा रस्त्यावरचे पडले किंवा पाडले गेले असतील ते बुजवण्याचे काम एकत्र मिळून करणार नसू, तर आपल्याला निवडून दिलेल्या जनेतचे दुर्भाग्य असेल. खड्ड्यात गेलेली लोकशाही, असे बोलण्याची वेळ निदान त्यांच्यावर येऊ द्यायची नसेल तर विकासाच्या कामात राजकीय जोडे आणू नयेत. हे माझे महाराष्ट्राचे राज्य आहे, जसे ज्योतिरादित्य शिंदे बोलले ती परंपरा आपण घेऊन पुढे जातो आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

खोटे बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढले

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खोटे बोलणारी माणसे आवडत नव्हती हे खरे आहे आणि म्हणूनच खोटे बोलणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतून काढून टाकले. नजर लावू नये म्हणून काळा टिका लावावा लागतो. तशीही माणसे आहेत. लघु का असेना, सूक्ष्म का असेना पण मोठे खाते तुमच्याकडे आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राच्या भल्यासाठी होईल, याकडे पाहावे, अशी बोचरी टीका करत विकासामध्ये कुठेही मी पक्षभेद आणत नाही. तुमच्या कॉलेजच्या बाबतीत जेव्हा तुम्ही फोन केला, तेव्हा दुसऱ्या क्षणाला मी सही केली. पेढ्यातला गोडवा दाखवावा लागतो, अंगी बाणवावा लागतो, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. 
 

Web Title: cm uddhav thackeray inauguration chipi airport and taunts narayan rane over politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.