सहायक गटविकास अधिकाऱ्यांना घेराव
By admin | Published: April 26, 2016 12:11 AM2016-04-26T00:11:41+5:302016-04-26T00:11:41+5:30
आर्चिणे ग्रामस्थ आक्रमक : महाराष्ट्र ग्रामीणचे काम ग्रामसेवकाने थांबविले, मजुरीही थकीत
वैभववाडी : ‘महाराष्ट्र ग्रामीण’ रोजगार हमी योजनेतून मंजूर असलेले आर्चिणे- धनगरवाडा रस्त्याचे काम उपसरपंचांच्या हरकतीवरून ग्रामसेवकाने थांबविल्यामुळे धनगरवाड्याच्या संतप्त ग्रामस्थांनी सहायक गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांना घेराव घातला. त्यावेळी जाधव यांनी ग्रामसेवक एस. एस. कदम यांना धारेवर धरत तातडीने काम सुरू करण्याचे तसेच थकीत मजुरीही तातडीने देण्याचे आदेश दिले.
आर्चिणे-धनगरवाडा ही वस्ती गावापासून सुमारे साडेचार किलोमीटरवर असून, तेथे बारमाही रस्ता नसल्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण योजनेतून सुमारे साडेचार लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्या कामावर धनगरवाडा येथील मजूर काम करीत होते. या मजुरांना गेल्या दीड महिन्यांची मजुरीच दिलेली नाही. तरीही मजूर ‘महाराष्ट्र ग्रामीण’चे काम करीत असताना चक्क ग्रामसेवकाने या रस्त्याचे काम थांबविले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी दुपारी पंचायत समितीत धाव घेत संतोष बोडके यांच्या नेतृत्वाखाली सहायक गटविकास अधिकारी जाधव यांना घेराव घातला.
केवळ गरज म्हणून दीड महिना मजुरी मिळालेली नसतानासुध्दा आमचे लोक रस्त्यावर काम करीत होते; परंतु ग्रामसेवक कदम यांनीच आम्हाला महाराष्ट्र ग्रामीणचे काम थांबविण्यास सांगितले, अशी तक्रार सहायक गटविकास अधिकारी जाधव यांच्याकडे आर्चिणे धनगरवाड्याच्या ग्रामस्थांनी केली. त्यावेळी जाधव यांनी एकतर महाराष्ट्र ग्रामीणची कामे होत नाहीत; आणि तुम्ही सुरू असलेले काम का थांबविता? असा प्रश्न उपस्थित करून जाधव यांनी ग्रामसेवक कदम यांना धारेवर धरले. त्यावेळी जमीन मालकांची हरकत असल्याचे सांगून कदम यांनी स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
कदम यांचे स्पष्टीकरण ऐकून आर्चिणे धनगरवाड्याचे ग्रामस्थ संतापले. २00१ मध्ये ग्रामपंचायत दप्तरी २६ नंबर रजिस्टरला नोंद झालेल्या रस्त्यावर जमीन मालकांची हरकत येतेच कशी? असा सवाल करून लेखी हरकत असेल, तर आम्हाला ग्रामपंचायतीमार्फत तसे पत्र द्या, अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी जाधव यांनी कदम यांना तुम्ही ग्रामपंचायत अधिनियम डावलून काम का करता? अशी विचारणा करीत थांबविलेले काम तत्काळ सुरूकरा. तसेच दीड महिन्यांची थकीत मजुरीही तातडीने देण्याचे आदेश जाधव यांनी दिले. यावेळी संतोष बोडके, रमेश झोरे, विठ्ठल हुंबे, बाबू गुरखे, वाघोबा झोरे, राजाराम शिंगाडे, जनार्दन शिंगाडे, राजाराम झोरे, जनार्दन झोरे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
उपसरपंचांच्या हरकतीमुळे काम थांबविले : कदम
आर्चिणे धनगरवाडा रस्त्याचे काम ‘महाराष्ट्र ग्रामीण’मधून मंजूर असून, या कामाला ७ मार्चला सुरुवात झाली आहे. धनगरवाड्यावरील नऊ जॉबकार्डधारक मजूर रस्त्यावर काम करीत आहेत. त्यांच्या मजुरीचा एक हप्ता खात्यात जमा केला असून, ४४ दिवसांची मजुरी देय आहे. मात्र, उपसरपंच सुशीलकुमार रावराणे यांनी आपल्या जमिनीतून रस्ता नेण्यास हरकत घेतल्यामुळे आपण हे काम थांबविले आहे, असे स्पष्टीकरण ग्रामसेवक एस. एस. कदम यांनी सहायक गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांना दिले. त्यावर २६ नंबरला नोंद असलेल्या रस्त्यावर जमीन मालकाच्या हरकतीचा प्रश्न येतोच कुठे? असा जाधव यांनी प्रश्न उपस्थित केल्याने कदम निरुत्तर झाले.