जागतिक नारळ दिन : नारळ लागवडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 04:07 PM2020-09-05T16:07:37+5:302020-09-05T16:11:26+5:30
कल्पवृक्ष असलेल्या नारळ लागवडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक वाव आहे. जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी केरळप्रमाणे नारळ लागवड केली पाहिजे. त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढीस नारळ लागवड तारणहार ठरणार आहे, असे प्रतिपादन एम. के. गावडे यांनी केले.
वेंगुर्ला : कल्पवृक्ष असलेल्या नारळ लागवडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक वाव आहे. जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी केरळप्रमाणे नारळ लागवड केली पाहिजे. त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढीस नारळ लागवड तारणहार ठरणार आहे, असे प्रतिपादन एम. के. गावडे यांनी केले.
वेंगुर्ला येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेत दरवर्षीप्रमाणे जागतिक नारळ दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सल्लागार एम. के. गावडे यांनी मार्गदर्शन केले. या जागतिक नारळ दिन कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष के. जी. गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या सचिव प्रज्ञा परब, नारळ मित्र नारायण भिकाजी उर्फ रमण खानोलकर, सुजाता देसाई, स्वप्नील परब, नीतेश मयेकर, नंदगडकर, प्रदीप सावंत आदी उपस्थित हाते.
संस्थेतर्फे दरवर्षी २ सप्टेंबरला नारळ दिन साजरा केला जातो. यावेळी निवडक शेतकरी व नारळ मित्र यांचा सत्कार करण्यात येतो. कोकणच्या आर्थिक उन्नतीसाठी व्यावसायिक दृष्टीने नारळ लागवड व्हावी यासाठी शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी हा यामागील उद्देश असल्याचे संस्थेच्या सचिव प्रज्ञा परब यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसेच एम. के. गावडे यांच्या मातोश्री सत्यवती गावडे यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रज्ञा परब यांनी केले.
काजूप्रमाणे नारळ लागवड करा : गावडे
नारळ हा कल्पवृक्ष आहे. एक नारळाचे झाड एका माणसाला संपूर्ण वर्षभर पोसू शकते. नारळाचा कोणताच भाग वाया जात नाही. झावळ, सोडणे, खोड, करवंटी सर्वच भाग हे पैसा मिळवून देणारे आहेत. तरीही आपल्याकडे नारळ लागवडीकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. आंबा, काजू लागवडीप्रमाणेच येथे नारळ लागवड मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन के. जी. गावडे यांनी केले. संस्था दरवर्षी जागतिक नारळ दिनाच्या निमित्ताने नारळ उत्पादक शेतकरी व नारळ मित्र यांना नारळ लागवडीसाठी प्रेरणा मिळावी, यासाठी करीत असलेले प्रयत्न कौतुस्कास्पद असल्याचे ते म्हणाले.
रमण खानोलकर, स्वप्नील परब यांचा सत्कार
यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात नारळ उत्पादक शेतकरी तसेच नारळ मित्र रमण खानोलकर, स्वप्नील परब यांचा शाल, श्रीफळ व नारळाचे झाड देऊन सत्कार करण्यात आला.
सिंधुफोटो ०१
जागतिक नारळ दिन कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष के. जी. गावडे यांनी केले. यावेळी एम. के. गावडेही उपस्थित होते. (छाया : सावळाराम भराडकर)