एसटीच्या संपाचा तळेरे बाजारपेठेला फटका, बाजारपेठेत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 06:03 PM2017-10-17T18:03:20+5:302017-10-17T18:09:52+5:30
एस. टी. कर्मचार्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून केलेल्या बेमुदत संपाचा तळेरे बाजारपेठेला मोठा फटका बसला. ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरू असलेल्या या संपामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. या संपामुळे मंगळवारी दिवसभर एस. टी. स्थानकावरही शुकशुकाट होता.
तळेरे , दि. १७ : एस. टी. कर्मचार्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून केलेल्या बेमुदत संपाचा तळेरे बाजारपेठेला मोठा फटका बसला. ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरू असलेल्या या संपामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. या संपामुळे मंगळवारी दिवसभर एस. टी. स्थानकावरही शुकशुकाट होता.
तळेरे बाजारपेठेत दर मंगळवारी परिसरातील सुमारे ३० ते ३५ गावचे ग्राहक खरेदीसाठी येतात. यामध्ये बहुतेक ग्राहक हे ग्रामीण भागातून येणारे असतात. याशिवाय तळेरेचा बाजार हा ऐन सणाच्या निमित्ताने दरवेळीच भरलेला असतो. यावेळी मात्र उलट परिस्थिती पहायला मिळाली.
बुधवारी दीपावली असल्यामुळे हा आठवडा बाजार चांगला भरेल अशी अनेक विक्रेत्यांची अपेक्षा होती. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर एस. टी. कर्मचार्यांनी केलेल्या संपाचा फटका या बाजाराला चांगलाच बसला. या आठवडा बाजाराला दिवाळी व भाऊबीजसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी आल्या होत्या.
मात्र सकाळ, दुपार व सायंकाळीही बाजारात अपेक्षेएवढी गर्दी दिसत नव्हती. दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध सजावटीच्या वस्तू, आकाशकंदील, फळे, कपडे, भाजी अशा विविध प्रकारच्या विक्रेत्यांना या संपाचा जोरदार फटका बसला.
त्यातही काही ठिकाणचे वृद्ध सकाळी येताना बाजारात आले, मात्र बाजार घेतल्यानंतर पुन्हा घरी जायला वाहन नसल्याने त्यांची मोठी गैरसोय झाल्याचेही पहायला मिळाले.