कोल्हापुरी संस्थांचे सिंधुदुर्गात संकलन

By admin | Published: June 18, 2015 10:20 PM2015-06-18T22:20:41+5:302015-06-19T00:21:25+5:30

पशुसंवर्धन समिती सभा : दूध संकलनाच्या उपशाखांची चौकशी करा

Collections of Kolhapuri Institutes in Sindhudurg | कोल्हापुरी संस्थांचे सिंधुदुर्गात संकलन

कोल्हापुरी संस्थांचे सिंधुदुर्गात संकलन

Next

सिंधुदुर्गनगरी : कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदणीकृत दुग्ध संस्था आपली उपशाखा सिंधुदुर्गात सुरु करून दूध संकलन करीत आहेत. याचा स्थानिक नोंदणीकृत दूध संघांना फटका बसत आहे. त्यामुळे अशा दूध संकलन करणाऱ्या उपशाखांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, असे गुरुवारी पशुसंवर्धन समिती सभेत निश्चित करण्यात आले. हा मुद्दा सदस्य आत्माराम पालयेकर यांनी उपस्थित केला होता.जिल्हा परिषद पशुसंवर्धन समिती सभा उपाध्यक्ष व समिती सभापती रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य आत्माराम पालयेकर, सीमा परुळेकर, सुचिता वजराठकर, समिती सचिव व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. के. चंदेल, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.दूध संकलन करण्यासाठी काही गावात ४ ते ५ दूध संकलन संस्था आहेत. या सर्व संस्था नोंदणीकृत आहेत. तसेच त्याच गावांमध्ये उपशाखाही आहेत. त्यामुळे नोंदणीकृत संघांवर त्याचा परिणाम होत आहे. आंबोलीसारख्या गावामध्ये दूध संकलनाच्या उपशाखा धरून तीन संस्था कार्यरत आहेत. या उपशाखा कोल्हापूर जिल्ह्यातील असून त्याची चौकशी करावी व अशा संघांवर कारवाई करावी असे सभेत निश्चित करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने गेल्या महिन्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने नव्या सहा योजना तयार केल्या आहेत. मात्र, त्या योजनांसाठी अद्यापपर्यंत निधीची तरतूदच नसल्याने या योजना राबवाव्या कशा असा मुद्दा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चंदेल यांनी सभागृहात उपस्थित केला. या मुद्द्यावर चर्चा करताना समिती सभापती रणजित देसाई म्हणाले की, डिसेंबरनंतर ज्या योजना राबवायच्या आहेत. त्यामध्ये पशुपक्षी प्रदर्शन यासह चार योजनांचे पैसे या सहा योजनांवर वळते करा व सुधारीत अंदाजपत्रकामध्ये वाढीव निधीची तरतूद करा असे स्पष्ट केले. मार्चमध्ये ज्या लाभार्थ्यांना जनावरांसाठी लागणारे कर्जप्रकरण मंजूर झाले असूनसुद्धा अद्याप ‘त्या’ कर्जाची उचल केली नाही. त्यामुळे जनावरे खरेदी केलेली दिसून येत नाहीत. येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांनी जनावरे खरेदी करावीत अन्यथा कर्जप्रकरण रद्द करून प्रतीक्षा यादीवरील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली.(प्रतिनिधी)



वैरण विकास जनजागृती पंधरवडा
१ जुलै या कृषी दिनानिमित्त १ ते १५ जुलै या कालावधीत वैरण विकास जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येणार असून, यावेळी कडवळ व यशवंत ढोम या चारा बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे. पारंपरिक चाऱ्यामध्ये पोषक तत्वे नसल्यामुळे दुधामध्ये पॅरामीटर कमी मिळतात. त्यामुळे या नव्या चारा बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या नव्या चाऱ्याची किमान ४ वेळा कापणी करता येणार आहे. तसेच आॅगस्टमध्ये तीन दिवसांचा पशुबाजारही भरविण्यात येणार असून, त्याचे ठिकाण व तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असेही सभागृहात स्पष्ट करण्यात आले.


कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदणीकृत दुग्ध संस्थांची उपशाखा सिंधुदुर्गात.
स्थानिक नोंदणीकृत दूध संघांना फटका.
आंबोलीत दूध संकलनाच्या उपशाखांसह तीन संस्था कार्यरत.
दूध संकलन करणाऱ्या उपशाखांची चौकशी करण्याची मागणी.

Web Title: Collections of Kolhapuri Institutes in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.