शेजवलीत ५ एकर जागेत सामूहिक शेती, पिढ्यान्पिढ्यांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:08 PM2020-08-20T17:08:18+5:302020-08-20T17:15:38+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शेजवली (जि. रत्नागिरी) गावात एक आगळीवेगळी परंपरा पहायला मिळते. गावातील सर्वजण एकत्रित येऊन सुमारे ५ एकर जागेत उन्हाळी व पावसाळी शेती करतात. यातून मिळणारे उत्पन्न गावातील मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी वापरले जाते. ही परंपरा पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे, अशी माहिती रवी पवार यांनी दिली.
निकेत पावसकर
तळेरे (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शेजवली (जि. रत्नागिरी) गावात एक आगळीवेगळी परंपरा पहायला मिळते. गावातील सर्वजण एकत्रित येऊन सुमारे ५ एकर जागेत उन्हाळी व पावसाळी शेती करतात. यातून मिळणारे उत्पन्न गावातील मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी वापरले जाते. ही परंपरा पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे, अशी माहिती रवी पवार यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, शेजवली गावात स्थानेश्वर देव व निनादेवी मंदिराची ५ एकर जागा आहे. या जागेवर मधलीवाडी, भटवाडी, वरचीवाडी या वाडीतील प्रत्येक गावातील एक-दोन माणसे एकत्रित येऊन उन्हाळी व पावसाळी शेती करतात. दरवर्षी पावसाळी शेती करायला १५ ते २० जोते असतात. यावर्षी १५ जोते होती. तर काम करायला लहानांपासून वृद्धापर्यंत सुमारे ४५ माणसे होती.
मशागतीपासून शेतीच्या कामाला सुरुवात होते. गावात शेतीच्या कामाला सुरुवात याच जागेवर मशागत करून केली जाते. मशागतीपासून प्रत्यक्षात उत्पन्न मिळेपर्यंत सामूहिक सहभाग दिसून येतो. यावर्षी १५ किलो बियाणे पेरले असून शेती करायला ३ दिवस लागले.
ही जमीन पाणथळ असल्याने तिथे उशिरा शेती केली जात असल्याचे पवार यांनी सांगितले. मागील पाच वर्षांपासून निनादेवी मंदिरात नियमित दर मंगळवारी महाप्रसाद असतो. त्यासाठीही या शेतीतून मिळणारे उत्पन्न वापरले जाते. ही सामूहिक शेती केव्हापासून सुरू आहे हे कोणालाही माहीत नाही.
उत्सवात लागणारा तांदुळ याच शेतीतून पिकतो
या मंदिरात वार्षिक सर्व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. शिमगा, नवरात्र, देवदिवाळी, दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा, आषाढी आणि कार्तिकी एकादशी असे विविध सण साजरे केले जातात. याशिवाय निनादेवीचा २६ एप्रिलला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
यावेळी महाप्रसादासाठी लागणारे तांदुळ या शेतीतील उत्पन्नामधून घेतले जातात. उर्वरित तांदुळ ज्यांची शेती नाही अशांना विक्री केली जाते. याच जमिनीवर कुळीथ, मूग आणि मटकीची शेती केली जाते. यावर्षी पेरलेल्या १५ किलो बियाण्यांपासून सुमारे ४0 मण भात मिळेल, अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली.