महाविद्यालयीन प्रवेशाचा घोळ
By admin | Published: August 11, 2015 11:24 PM2015-08-11T23:24:16+5:302015-08-11T23:24:16+5:30
अॅडमिशन न मिळाल्यास सेनेचे उपोषण : शिवसेना, कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांचा प्राचार्यांना जाब
कणकवली : कॉलेज प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिवसेना आणि कॉँग्रेसचे पदाधिकारी मंगळवारी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना भिडले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी १५ आॅगस्टपर्यंत योग्य निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला तर कॉँग्रेस नगरसेवकांनी अतिरिक्त प्रवेशासंदर्भातील पत्र घेऊनच प्राचार्यांना पुढील प्रक्रिया करण्यासाठी आग्रह धरला. कणकवली महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेसाठी अतिरीक्त जागांना मंजुरी मिळण्याच्या शक्यतेवर प्रवेश देण्यात आला होता. मात्र, मंजूर जागा भरल्याने महिनाभरानंतर काही विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क परत करून २२ विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी कणकवली महाविद्यालयात धाव घेतली. प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे यांची भेट घेत वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी महाविद्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राजू राणे, प्रथमेश सावंत, युवा सेना तालुकाप्रमुख राजू राठोड आदी पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य शिंदे यांची भेट घेऊन जाब विचारला. प्राचार्य शिंदे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अतिरिक्त तुकडीला मान्यता देण्याचे आश्वासन पाळलेले नाही. तात्पुरते अॅडमिशन देण्यात आले होते. मात्र, विद्यापीठाच्या मंजूर जागांपेक्षा जास्त प्रवेश देऊ शकत नाही. विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले शुल्क परत करण्यात आले आहे. तुम्ही सत्तेत आहात तर तुम्ही प्रश्न सोडवा, असे सांगितले. रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात असल्याचा प्रथमेश सावंत यांनी आरोप केला. ते म्हणाले की, ५० टक्के गुण असलेल्यांना प्रवेश मिळत असून ९० टक्केवाल्यांना का नाही? असा प्रश्न करत सत्तेत राहून आंदोलन करावे लागत आहे हे दुर्दैवी आहे.
शिक्षणमंत्री तावडे यांचा आम्ही निषेध करत असून १५ आॅगस्टपर्यंत योग्य निर्णय न झाल्यास कॉलेज समोर उपोषण केले जाईल, असा इशारा राजू राणे यांनी दिला.
कॉँग्रेस नगरसेवकांनी पत्र दाखवले
शिवसेनेचे पदाधिकारी जाताच विद्यार्थ्यांचा प्रश्न घेऊन कॉँग्रेसचे नगरसेवक कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, गौतम खुडकर हे प्राचार्यांच्या दालनात दाखल झाले. विद्यापीठाने प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची यादी पाठवण्यासाठी जारी केलेले पत्रच यावेळी नगरसेवक खुडकर यांनी सादर केले. मात्र, प्राचार्यांनी असे पत्र अद्याप आपणास प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. या पत्रानुसार १४ आॅगस्टपर्यंत अतिरिक्त विद्यार्थ्यांची यादी पाठवण्याचे विद्यापीठाने कळविलेले आहे. ही चर्चा सुरू असताना कर्मचाऱ्याने महाविद्यालयास प्राप्त पत्र आणून दाखवले. अधीक्षक रंजन राणे हे जाग्यावर नसल्याने पत्र मिळाले नाही. आता अतिरिक्त विद्यार्थ्यांची यादी पाठवतो, असे प्राचार्य शिंदे यांनी सांगितले. प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २२ एवढी सांगितली जात असली तरी महाविद्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे यापेक्षा मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत, असा आरोप नगरसेवक खुडकर यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)