सत्ताधारी नगरसेवकांत कलगीतुरा
By admin | Published: August 13, 2015 11:10 PM2015-08-13T23:10:15+5:302015-08-13T23:10:15+5:30
गटनेते पदाचा वाद : कणकवली नगरपंचायत विषय समिती सदस्य निवड
कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सदस्य निवडीच्यावेळी सत्ताधाऱ्यांमध्येच गटनेता निवडीवरून कलगीतुरा रंगला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये दोन गट असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सभापती निवडीसाठी पिठासीन अधिकारी प्रांताधिकारी संतोष भिसे यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करून सत्ताधाऱ्यांचे दोन गट तर विरोधकांच्या एका गटातील नगरसेवकांची विषय समितीच्या सदस्य म्हणून निवड केली. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विषय समिती सभापती निवड करण्यात येणार आहे. विरोधी नगरसेवक ज्या गटाला समर्थन देतील त्या गटाचा सभापती विराजमान होणार आहे.
येथील नगरपंचायतीच्या सार्वजनिक बांधकाम समिती, महिला व बालकल्याण समिती, पाणीपुरवठा व जलनिस्सारण तसेच बाजार समिती आणि आरोग्य समितीच्या सभापतींची मुदत संपत असल्याने गुरुवारी या समितीच्या सदस्यांची निवड करण्यासाठी नगरपंचायतीच्या प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निवडणूक प्रक्रियेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी संतोष भिसे उपस्थित होते. मुख्याधिकारी अवधुत तावडे यांच्यासह नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत, उपनगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह इतर सदस्यही यावेळी उपस्थित होते.
नगरपंचायतीत सत्ताधारी काँग्रेसचे १३ सदस्य आहेत. तर शिवसेनेचे ३ व भाजपाचा १ सदस्य आहे. सभापती निवडीसाठी सदस्यांचा गट स्थापन करून त्यांचा गटनेता हा सदस्यांची नावे पिठासीन अधिकाऱ्यांसमोर सादर करतो. काँग्रेसच्या रूपेश नार्वेकर तसेच समीर नलावडे या दोघांकडूनही गटनेत्यासाठीची पत्रे अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आली. विषय समिती सदस्य पदासाठी आपल्या गटातील नगरसेवकांची नावेही देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसचा अधिकृत गट कोणता? असा प्रश्न निर्माण झाला. यावरुन दोन्ही गटात जोरदार वादावादी झाली.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी उपनगराध्यक्ष समीर नलावडे यांना सभापती निवड प्र्रक्रियेसाठी गटनेता नियुक्त करण्यात येत असल्याचे पत्र दिले होते. ते पीठासीन अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. या पत्रासोबत अभी मुसळे, बंडू हर्णे, सुविधा साटम, किशोर राणे, गौतम खुडकर, माया सांब्रेकर आणि समीर नलावडे अशा सात सदस्यांच्या सह्या असलेला कागद होता. तर रूपेश नार्वेकर यांनी सादर केलेल्या पत्रासोबत नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत, मेघा गांगण, सुमेधा अंधारी, माधुरी गायकवाड, कन्हैया पारकर आणि रूपेश नार्वेकर अशा सहा सदस्यांच्या सह्या असेला कागद जोडण्यात आला होता. या दोघांकडूनही गटनेता आपण असल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे वाद निर्माण झाला. यामध्ये हस्तक्षेप करीत अधिकाऱ्यांनी तुमचे गट जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणीकृत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला.
तसेच वाद क्षमविण्यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्या अधिकाराचा वापर करत विषय समितीसाठी सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये महिला व बालकल्याण समितीसाठी सुविधा साटम, मेघा गांगण, सुमेधा अंधारी, नंदीनी धुमाळे, सार्वजनिक बांधकाम समितीसाठी राधाकृष्ण उर्फ रुपेश नार्वेकर, गणेश हर्णे, कन्हैया पारकर, अभी मुसळे व सुशांत नाईक तर आरोग्य समितीसाठी गौतम खुडकर, मेघा गांगण, माधुरी गायकवाड, राजश्री धुमाळे व किशोर राणे तर पाणीपुरवठा समितीसाठी समीर नलावडे, कन्हैया पारकर, सुमेधा अंधारी, माधुरी गायकवाड, राजश्री धुमाळे यांचा समावेश होता.
विषय समितीच्या अध्यक्षपदासाठी उमेदवाराचे नाव सुचविताना एक सूचक व एक अनुमोदक आवश्यक असतो. त्यामुळे सभापती निवडीच्या वेळी या निकषाची पूर्तता करु शकणाऱ्याच गटाचा सभापती होणार आहे. यामुळे विरोधी नगरसेवकांची भूमिका सभापती निवडीमध्ये महत्त्वपूर्ण राहणार आहे. पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षपदी उपनगराध्यक्ष हे पदसिद्ध सभापती असतात. त्यामुळे त्या समितीच्या सभापती पदाचा मान समीर नलावडे यांना मिळणार
आहे. (वार्ताहर)
हरकत नोंदविणार
नगरपंचायत सभापती निवडीवेळी गटनेतेपद हे त्या वेळी ठरविले जात होते. ते त्याच प्रक्रियेपुरते मर्यादित असायचे. एखादा सदस्य आपला गटनेता असल्याचे पत्र इतर सदस्य आपल्या सहीने पीठासीन अधिकाऱ्यांसमोर सादर करीत असतात. या आधीच्या निवडणुकांमध्ये रूपेश नार्वेकर हे गटनेते होते. मात्र यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी आपणाला गटनेतेपद म्हणून घोषीत केले आहे. तसे पत्रही त्यांनी दिले असून त्यावर सात सदस्यांच्या सह्या आहेत. यापूर्वी असा प्रसंग न उद्भवल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे गटाची नोंदणी करण्याचा प्रश्नच निर्माण झालेला नव्हता. जाहीर केलेल्या सदस्यांची नावे मान्य नसल्याने याबाबत आम्ही नगरपंचायत अॅक्टनुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकत नोंदविणार असल्याचे नलावडे यांनी सांगितले.
या आधीच्या निवडणुकांच्या वेळी रूपेश नार्वेकर हे आमचे गटनेते होते. त्यामुळे त्यांनी गटनेत्यासाठीचे पत्र आणल्यानंतर आम्ही सदस्य म्हणून त्यावर सह्या केल्या. मात्र, पक्षातर्फे समीर नलावडे यांना दिलेल्या पत्राबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती. रूपेश नार्वेकर यांच्या पत्रावर आधीच सही केलेली असल्याने नलावडे यांच्या पत्रावर आमची सही झाली असती तर तांत्रिक अडचण निर्माण झाली असती. यासाठीच समीर नलावडे यांच्या पत्रावर सह्या केल्या नाहीत. आम्ही काँग्रेसचेच नगरसेवक असून या आधीही व यानंतरही नारायण राणेंचेच नेतृत्व आमच्यासाठी अंतिम असेल असे नगराध्यक्षा प्रज्ञा खोत व मेघा गांगण यांनी स्पष्ट केले.