कणकवलीत रंगसंगीत, संगीत, एकांकिका स्पर्धा
By admin | Published: November 8, 2015 11:28 PM2015-11-08T23:28:30+5:302015-11-08T23:32:49+5:30
कलाविष्कार : २७, २८ रोजी कणकवली कॉलेजच्या सभागृहात आयोजन
देवगड : अक्षर सिंंधु साहित्य कला मंच सिंंधुदुर्ग कणकवली आयोजित रंगसंगीत, संगीत व गद्य एकांकिका स्पर्धा २७ व २८ नोव्हेंबर रोजी कणकवली कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
संगीत रंगभूमीवर वेगळा परिणाम साधणारी संगीत नाटके करणारी संस्था अशी अक्षर सिंधु साहित्य कला मंचची ओळख आहे.
संगीत एकांकिका या आकृतिबंधातून संगीत नाटकाला देखील चालना मिळावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन गेली सहा वर्षे मंचतर्फे करण्यात येत आहे.
कणकवली कॉलेज येथे २७ व २८ नोव्हेंबरला दिवस-रात्र या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एका संघास दोन्ही गद्य व पद्य एकांकिका सादर करता येतील. या स्पर्धेची प्रवेशिका व प्रवेश अर्ज २० नोव्हेंबरपर्यंत द्यावयाचे असून प्रवेश विनामूल्य आहे.
या स्पर्धेबाबत माहिती देताना अक्षरसिंंधु साहित्य कलामंच सिंंधुदुर्गचे संस्थापक विजय चव्हाण व थिएटर अॅकॅडमीचे सागर अत्रे म्हणाले की, नाट्य व संगीत या दोन ललित कलांचा संबंध नेहमीच जवळचा असून रंगभूमीशी फार घनिष्ठ होता. आधुनिक मराठी नाटक गावातच जन्माला आले आणि ते पुढे कित्येक वर्षे बोलले कमी आणि गायले जास्त गेले. यामुळे संगीत नाटक कमालीचे लोकप्रिय झाले आहे. यामुळेच प्रेक्षक नाटक बघायला कमी व ऐकायला जास्त जाऊ लागले. पण संगीत नाटक तेवढ्या पुरते मर्यादीत राहू नये, कालबाह्य होऊ नये, स्वत:च्या बळावर संगीत नाटके वाढवावीत व सशक्त व्हावीत याच विचारातून थिएटर अॅकॅडमी पुणे व अक्षर साहित्य कलामंच सिंंधुदुर्ग काम करीत आहे. संगीत ज्याचा प्राण आहे अशा नव्या जाणिवतेची व अक्षरसिंंधु साहित्य बदलते वास्तव सांगणारे नवीन रंगभाषा शोधणारी नाटके
होणे गरजेचे आहे.
या दिशेने पाऊल टाकणाऱ्या ‘रंगसंगीत’ या एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी गद्य व पद्य एकांकिका स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन थिएटर अॅकॅडमी पुणेचे सागर अत्रे, अक्षरसिंंधुचे संस्थापक विजय चव्हाण, अध्यक्ष हरिभाऊ भिसे, कार्याध्यक्ष संजय राणे यांनी केले आहे.
प्रवेशिकांसाठी अधिक माहिती व संपर्कासाठी अक्षर सिंंधु साहित्य कलामंच सिंधुदुर्ग कणकवली या संस्थेचे अध्यक्ष प्रा. हरी भाऊ भिसे, कार्याध्यक्ष संजय राणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)
अक्षरसिंधुला प्राथमिक फेरीच्या आयोजनाचा मान
कणकवली येथे होणाऱ्या प्राथमिक फेरीच्या आयोजनाचा मान अक्षरसिंंधु साहित्य कलामंच यांना मिळाला आहे. याठिकाणी होणारी फेरी २७ व २८ नोव्हेंबरला होणार आहे. स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक गद्य व पद्य विभागातून काढण्यात येणार आहेत. प्राथमिक स्पर्धेत प्रथम क्रमांक ५ हजार, द्वितीय क्रमांक ३ हजार, तृतीय क्रमांक २ हजार अशी बक्षिसे व सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.