‘आले तर सोबत, नाहीतर अकेला चलो’
By admin | Published: October 18, 2015 11:18 PM2015-10-18T23:18:31+5:302015-10-18T23:30:45+5:30
नारायण राणेंची भूमिका : वैभववाडी नगरपंचायत निवडणूक
वैभववाडी : एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्याचा विकास पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे मतदार वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतींची सत्ता काँग्रेसच्या हाती देतील, याची खात्री आहे. त्यामुळे आम्ही वैभववाडीत १४ जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त करीत आघाडीबाबत ‘आले तर सोबत, नाहीतर अकेला चलो’ची भूमिका स्पष्ट करताना आम्ही कोणावर ‘डिपेंड’ नाही, असे काँग्रस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे सांगितले.
आमदार नीतेश राणे यांच्या येथील संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, आदी उपस्थित होते.नारायण राणे पुढे म्हणाले, अच्छे दिन येणार म्हणून सांगून शिवसेना, भाजपने सत्ता मिळवली. सत्तेवर येताच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवून जनतेला बुरे दिन दाखवायला सुरुवात केली आहे. पालकमंत्री असताना मी सुरू केलेले सर्व प्रकल्प वर्षभर बंद आहेत. रेडी बंदर विकासाला खो घातला आहे. विमानतळ, सी वर्ल्ड प्रकल्प बंद आहे. दोडामार्ग एमआयडीसीचे भूसंपादन आपण करून घेतले. वर्षभरात एकही पाऊल पुढे पडले नाही. हे पाहता दोन्ही ठिकाणचे मतदार काँग्रेसलाच सत्ता देतील, असा विश्वास व्यक्त केला.ते पुढे म्हणाले, विधानसभेत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना पालकमंत्री वाऱ्याने झाड हलते तसे हलताना दिसतात. अशा शब्दांत खिल्ली उडवत नगरपंचायतींना निधी कसा आणतात, हे वैभव नाईक यांना माहिती आहे का? असा सवाल करीत नगरविकास कायद्यानुसार निधी दिला जातो. त्याचा सत्ता असण्या-नसण्याशी काही संबंध नाही, असे स्पष्ट करीत आमदार म्हणून नीतेश राणे नगरविकास खात्याकडे पाठपुरावा करून वैभववाडीच्या विकासाचे प्रकल्प मंजूर करून घेतील, असा विश्वास नारायण राणे यांनी दिला. (प्रतिनिधी)
त्यांना कोणी अडवले का?--शिवसेना आणि भाजपने दोन दिवस दहशतवादाच्या मुद्द्यावर रान उठवले आहे. याबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले, कुठे आहे दहशत तुम्हाला कुठे दिसते सांगा. प्रचारासाठी येणाऱ्या शिवसेना, भाजपवाल्यांना कोणी इकडे अडवले का? असा सवाल करीत नाकर्तेपणा झाकण्यासाठी दहशतीचे नाटक करून शिवसेना आणि भाजप जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला.