हिंमत असेल तर खुल्या व्यासपीठावर या, नितेश राणेंचे संजय राऊतांना आव्हान
By सुधीर राणे | Published: October 6, 2023 01:03 PM2023-10-06T13:03:46+5:302023-10-06T13:04:41+5:30
'संजय राऊत यांना स्वत: मुख्यमंत्री व्हायचे होते'
कणकवली: महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेचा विषय झाला त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, असे सांगितले होते. मात्र, खासदार संजय राऊत यांनी आमदारांना फोन करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको म्हणून सांगा आणि आपले नाव पुढे केले होते. परंतु उद्धव ठाकरे यांच्या घरातूनच उद्धव ठाकरेंचे नाव चालविले गेल्यानंतर हेच राऊत त्यांना कसे शिव्या घालत होते, याचे पुरावे आपल्याकडे आहेत. हिंमत असेल तर तारीख व ठिकाण ठरवून त्यांनी खुल्या व्यासपीठावर यावे, असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना दिले आहे.
आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धिमध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, जे आयुष्यात कधीच खरे बोलले नाहीत, ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. मात्र, फडणवीस यांनी अनेकांचा बुरखा फडण्याचे काम केले. मविआचे सरकार आले त्यावेळी संजय राऊत यांना स्वत: मुख्यमंत्री व्हायचे होते. यासाठी एकनाथ शिंदे नको म्हणून त्यांनी आमदारांना फोन करून सांगायला सांगितले, त्यासाठी बैठकही बोलावली होती. मात्र चार पाचच आमदार आले होते. या साऱ्याचे पुरावे आपल्याकडे आहेत.
उद्धव ठाकरेंच नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवा, असे सांगत सिल्व्हर ओकमध्ये जाऊन कोण रडले हे सुद्धा आम्ही सांगू. संजय राऊत हे कायमच देश विरोधी भूमिका घेतात. राऊत व ठाकरे शिवसेना यांना आपच्या संजय सिंगबद्दल सहानुभूती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आता टीका केली जात आहे. मात्र, जेव्हा मविआमध्ये हे एकत्र होते तेव्हा ७० हजार कोटी दिसले नाहीत का? आमच्यावर आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे ते त्यांनी आधी बघावे.
आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या मतदारसंघात न केलेल्या कामांची चर्चा झाली पाहिजे. जे एकनाथ शिंदे यांना भेटतात त्या लोकांनी शिंदे व भाजपावर टीका करू नये. त्यांच्या काळात आरोग्य सेवा विस्कळीत होती. मात्र, आज सुधारणा होत आहे. कोविड काळात जेवढा खर्च दाखवला, तो झालाच नाही, असा आरोपही आमदार राणे यांनी यावेळी केला.
तर काँग्रेसचे स्वतःचे आरोग्य व्हेंटिलेटरवर आहे. त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. राज्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सक्षम आहेत असेही आमदार राणे यावेळी म्हणाले.