सिंधुदुर्गमधील विकृती नष्ट करण्यासाठी एकत्र या!, विनायक राऊत यांचे आवाहन
By सुधीर राणे | Published: June 22, 2023 03:36 PM2023-06-22T15:36:27+5:302023-06-22T15:36:49+5:30
श्रीधर नाईक यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली नरडवे तिठा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा हा विचारवंतांचा व संस्कृतीचे संवर्धन करणारा आहे. बॅ. नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू अशा विचारवंतांना सिंधुदुर्गवासीयांनी खासदार म्हणून नेतृत्व करण्याची संधी दिली. मात्र, अलीकडच्या काळात जिल्ह्यात राजकीय दहशतवाद व दादागिरी ही विकृती फोफावत चालली आहे. या विकृतीने विचारी व परोपकारी श्रीधर नाईक यांचा बळी घेतला. त्यामुळे ही विकृती नष्ट करण्यासाठी सिंधुदुर्गवायांनी एकत्र यावे असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी येथे केले.
श्रीधर नाईक यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली नरडवे तिठा येथे आदरांजली कार्यक्रम, रक्तदान शिबीर , बचतगटांच्या महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन नाईक कुटुंबीय व श्रीधर प्रेमींनी केले होते. यावेळी खासदार विनायक राऊत बोलत होते.
यावेळी आमदार वैभव नाईक, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अरुण दुधवडकर, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष अनंत पिळणकर, काँग्रसेचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,नीलम सावंत-पालव, मुरलीधर नाईक, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा श्रीधर नाईक यांचे सुपुत्र सुशांत नाईक, संकेत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, श्रीधर नाईक यांच्या समाजसेवेचा वारसा त्यांचे सूपुत्र सुशांत नाईक, संकेत नाईक, पुतणे आमदार वैभव नाईक समर्थपणे पुढे नेत आहेत. नाईक कुटुंबीय सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून श्रीधर नाईक यांच्या स्मृती जपण्याचे काम करीत आहेत. सुशांत नाईक हे युवासेनेचे काम करीत असून त्यांना चांगले राजकीय भवितव्य निश्चितच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार वैभव नाईक यांनी श्रीधर नाईक यांच्या कार्याचा वसा आम्ही पुढे नेत राहिलो, त्यामुळे मी आमदार होऊ शकलो असे मत व्यक्त केले.
पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहत नाही याची खंत
सिंधुदुर्गात फोफावलेल्या अपप्रवृतीविरोधात श्रीधर नाईक यांनी संघर्ष केला. कार्यकर्ता पक्षासाठी जीवाचे रान करून पक्षवाढीसाठी कार्य करतो. मात्र, त्याच्या पाठिशी खंबीरपणे पक्ष उभा राहत नाही, अशी खंत व्यक्त करतानाच श्रीधर नाईक यांच्याबाबतीत हेच घडले. जिल्ह्यात सध्या आसूरी शक्ती वाढत असून या शक्तीचा बीमोड करण्यासाठी श्रीधर नाईक प्रेमींनी एकत्र यावे, असे आवाहन सुधीर सावंत यांनी केले.