सावित्रीबार्इंचे स्वप्न साकार करा : भुस्कुटे
By admin | Published: March 15, 2015 11:38 PM2015-03-15T23:38:14+5:302015-03-16T00:10:22+5:30
मुलींना मोफत शिक्षण मिळते पण पुढील शिक्षणासाठी पैशाची अडचण आल्यास पैशाअभावी तुमचे शिक्षण थांबणार नाही याची काळजी मी घेईन, असे आश्वासन अशोक भुस्कुटे यांनी दिले.
चिपळूण : सावित्रीच्या लेकी तुम्ही खूप शिका! आणि सावित्रीबाईंचे स्वप्न साकार करा असे उद्गार स्वातंत्र्यसैनिक सिंधुताई भुस्कुटे यांनी काढले. दरवर्षीप्रमाणे सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी म्हणजेच नायगांव (खंडाळा) जिल्हा सातारा येथे दुर्गाशक्ती चिपळूणतर्फे जिल्हा परिषद शाळेतील सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मोफत सहल आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.जिल्हा परिषद शाळेतील सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये आठवीत प्रवेश घेण्यासाठी आत्मविश्वास जागृत करणे व किमान १० वी व १२ वीपर्यंत शिक्षण घेवून त्यांना करिअर निवडून त्यात यश संपादन करून आत्मनिर्भर व्हावे, यासाठी या पे्ररणासहलीचे आयोजन करण्यात येते, असे दुर्गाशक्तीच्या अध्यक्षा अश्विनी भुस्कुटे यांनी सांगितले़
दुर्गाशक्तीच्या कार्याबाबतची माहिती तसेच सावित्रीबार्ईंचे कार्य याबाबत सचिव सेजल कारेकर यांनी माहिती दिली़ चालक हेमंत भोसले यांनी सहलीदरम्यान घ्यावयाची काळजी, निरीक्षण कसे करावे व सहल पर्यावरणपुरक होण्यासाठी घ्यावायाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले़ सहलीस निरोप देण्यासाठी रसिका देवळेकर, रश्मी मोरे, स्वाती गुप्ते, वनिता दाभोळे, वसुंधरा पाटील या उपस्थित होत्या़ सहलीसोबत स्वातंत्र-सैनिक भुस्कुटे, श्वेता राव, अमृता भुस्कुटे व मधुरा केतन खांडेकर (वाहक) उपस्थित होत्या़ पेठमाप मराठी, उक्ताड, खेंड मुलांची, पागकन्या आणि मापारी ऊर्दू शाळेतील ४८ विद्यार्थिनी व शिक्षिकांनी सहभाग घेतला़ वाहक होण्यासाठी किती शिक्षण आवश्यक आहे, याबाबत माहिती मधुरा खांडेकर यांनी दिली़ मुलींना मोफत शिक्षण मिळते पण पुढील शिक्षणासाठी पैशाची अडचण आल्यास पैशाअभावी तुमचे शिक्षण थांबणार नाही याची काळजी मी घेईन, असे आश्वासन अशोक भुस्कुटे यांनी दिले.
नायगांव येथे सावित्रीबाई व महात्मा फुले यांची जीवनसृष्टी मुलींना दाखवण्यात आली़ शिक्षिका मिना गोगटे यांनी सहल आयोजकांचे आभार मानले़ (वार्ताहर)