कृती समिती धूर्त, प्रलंबित कामांना मुहूर्त!, जनरेटा पुढे नेण्यासाठी कार्यरत राहणे गरजेचे
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: January 13, 2023 06:05 PM2023-01-13T18:05:33+5:302023-01-13T18:09:17+5:30
टोलमुक्ती मिळविण्याचा निर्धार
महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : महामार्ग एनएच ६६ च्या चौपदरीकरण अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे ओसरगाव येथील प्रस्तावित टोलनाक्यावर टोलवसुलीची धावाधाव करणाऱ्यांना टोलमुक्त कृती समितीने जोरदार धक्का दिला. समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, पत्रकार, काही संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आवाज उठविल्यानंतर ठेकेदार कंपनीने महामार्गाची अपुरी कामे पूर्ण करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे टोलमुक्त कृती समितीचे कार्य धूर्त, महामार्गावरील प्रलंबित कामांना मुहूर्त अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
महामार्गाचे चौपदरीकरण झाले. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात घट झाली. सतत रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे होणारा त्रास वाचला. दळणवळण सोपे झाले. त्यामुळे चौपदरीकरण होताना येथील भूमिपुत्रांनी कुठलीही आडकाठी केली नाही. त्यांच्या मागण्या मान्य होतील आणि देशाच्या विकासप्रक्रियेत आपला हातभार लागेल, अशा सामाजिक दृष्टिकोनातून जिल्ह्यातील खारेपाटणपासून झारापपर्यंतच्या ७२ किलोमीटरच्या रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून दोन वर्षांत पूर्ण झाले.
ई-मेलरूपी पहिले पाऊल ठरले यशस्वी
- महामार्गावरील अपूर्ण कामे, दुरवस्था, टोलमुक्ती मिळावी, अशा अनेक मागण्या मध्यवर्ती ठेवून जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ई-मेल पाठवून लक्ष वेधले.
- त्यानंतर गडकरींनी तातडीने केंद्रीय अधिकाऱ्यांचे एक पथक पाठवून महामार्गाची पाहणी केली. त्यामुळे समितीचे हे पहिले पाऊल यशस्वी ठरले.
कामात अनेक त्रुटी
- महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात तळगाव (खारेपाटण) कलमठ ३८ किलोमीटर आणि दुसरा टप्प्यात कलमठ ते झाराप ४४ किलोमीटरचा समावेश आहे.
- मात्र, काम जरी पूर्ण झाले असले तरी त्यात अनेक त्रुटी होत्या. जरी सिंधुदुर्गातील मार्ग पुरा झाला असला तरी रत्नागिरी आणि रायगडमधील काम अजून मोठ्या प्रमाणात बाकी आहे.
- केवळ जिल्हापुरात टोलचा मारा करून लोकांना जेरीस आणले जाणार असल्याने टोलमुक्तीबाबत जनआंदोलन उभारण्यात आले. त्याला मोठा पाठिंबा मिळाला आहे.
टोलमुक्त समितीने जनरेटा कायम ठेवावा
- टोलमुक्त समितीने टोलमुक्तीसाठी उभा केलेला हा लढा किंवा उठाव कायम ठेवणे आवश्यक आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
- टोलमुक्तीबाबतची बांधिलकी जपली पाहिजे. समितीने ज्यांच्या हातात या कार्याची सूत्रे दिले आहेत. त्यांनी हा जनरेटा पुढे न्यायला हवा. लोकांचा सहभाग मिळण्यासाठी जनजागृती करत राहणे आवश्यक आहे.
सर्वपक्षियांचा पाठिंबा
सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती मिळण्यासाठी हा लढा उभारला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे अशा सर्वच पक्षातील नेतेमंडळींना साकडे घालण्यात आले. या सर्वच नेत्यांनी आपण जिल्हावासीयांच्या मागे असल्याची भावना व्यक्त करून प्रसंगी जिल्ह्यातील जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी पाठिंबा दर्शविला.
रुंदीकरण काम हाती
टोलमुक्ती कृती समितीच्या दणक्यानंतर बांधकाम मंत्री गडकरी यांच्या आदेशाने केंद्रीय अधिकारी पाहणी करून गेले. त्यानंतर तातडीने महामार्गावरील प्रलंबित कामे, रुंदीकरणाची कामे, गटार खोदाईच्या कामांनी तातडीने वेग घेतला आहे.
कणकवलीनजीकच्या वागदे, जानवली येथे, झाराप भागासह अन्य ठिकाणी काही कामे तातडीने सुरू झाली आहेत. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
कृती समितीचा सभांचा धडाका
सिंधुदुर्ग टोलमुक्त कृती समितीची स्थापना झाल्यानंतर अस्थायी समितीची पहिली सभा ९ डिसेंबर कुडाळ येथे झाली. त्यानंतर १५ डिसेंबरला वैभववाडी, देवगड, ओसरगाव, कसाल अशा चार सभा एकाच दिवशी घेण्यात आल्या. त्यानंतर २८ डिसेंबर कणकवलीत सभा झाली. त्यामुळे या सभांमधून टोलमुक्ती मिळविण्याचा निर्धार करण्यात आला.
ग्रामसभांच्या ठरावासोबत सह्यांची मोहीम राबवा
टोलमुक्तीसाठी ग्रामसभांचे ठराव घ्यायला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबरीने बाजाराच्या दिवशी लोकांच्या सह्यांची मोहीमेबाबत चर्चा झाली होती.
आता प्रत्यक्षात त्याबाबत कृती करून लोकांचा सहभाग या आंदोलनात वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी व्यापारी बांधवांनी पुढाकार घ्यायला हवा.