विजय सावंत साखर कारखान्याबाबत वक्तव्य चुकीचे, सुगंधा दळवी यांची टीका
By admin | Published: April 20, 2017 10:29 PM2017-04-20T22:29:12+5:302017-04-20T22:29:12+5:30
राणे व्हेंचर्स कंपनीचे संचालक तथा कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी विजय सावंत साखर कारखान्याबाबत केलेले वक्तव्य हे पूर्णतः चुकीचे
Next
>ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 20 - राणे व्हेंचर्स कंपनीचे संचालक तथा कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी विजय सावंत साखर कारखान्याबाबत केलेले वक्तव्य हे पूर्णतः चुकीचे आहे. तसेच लोकांची दिशाभूल करणारे आहे. अशी टिका साखर कारखान्याच्या संचालिका सुगंधा दळवी यांनी केली आहे.
> विजय सावंत साखर कारखान्याच्या संचालकांच्यावतीने प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात सुगंधा दळवी यांनी म्हटले आहे की, सन 2014 मध्ये भूमिपूजन झालेल्या आमच्या साखर कारखान्याचे काम रखडण्यास राणे व्हेंचर्स कंपनीच जबाबदार आहे. जिल्ह्यातील लोकांच्या भल्याचा विचार करून आता माघार घेवू इच्छिणाऱ्यानी जर खरोखरच मनापासून तसे केले असते, तर कारखाना सुरु होऊन दोन वर्षे झाली असती. मात्र, प्रत्यक्षात तसे झालेले नाही.
> न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. किंबहुना राणे व्हेंचर्स कंपनीला सुध्दा आम्हीच जिंकणार याची माहिती आहे. त्यामुळे भविष्यात होणारी बदनामी टाळण्यासाठी त्यांच्याकडून आता शहाणपनाचा आव आणला जात आहे. त्यामुळे कोणाच्या माघार घेण्याच्या उपकाराची विजय सावंत साखर कारखान्याला गरज नाही. वेळकाढुपणा करण्यापेक्षा न्यायालयात त्यांनी केस चालवून दाखवावी.
>राणे व्हेंचर्स कंपनीने नोंदणी व्हायच्या आधीच परवानगीसाठी अर्ज केला होता. त्यामुळे त्यांचा अर्ज वैध कसा ठरणार? साखर आयुक्त पुणे यांच्याकडे त्यांचा अर्ज 17 ऑगस्ट 2012 रोजी दाखल झाला. त्याचा अग्रक्रम 197 आहे. तर ज्या जागेवर कारखान्यासाठी हवाई अंतर मागितले ती जागा कासार्डे गट नं.42 ही अस्तित्वातच नाही. खोट्या सहया करून हे प्रकरण सादर केल्याप्रकरणी कणकवली पोलिस स्थानकात विजय सावंत यांनी तक्रार दाखल केली आहे. तसेच या तक्रारिची दखल न घेतल्याने उच्च न्यायालयात दावा दाखल केलेला आहे.
> आमच्या साखर कारखान्याचा अर्ज 14 मे 2012 रोजी दाखल झालेला असून त्याचा अग्रक्रम 194 आहे. त्याअगोदर 7 मे 2012 रोजी हवाई अंतरासाठी अर्ज केलेला आहे. आम्ही घेतलेल्या सर्व परवानग्या कायदेशीर आहेत. त्यामुळेच राणे व्हेंचर्सला तिन वेळा हरावे लागले. त्यांच्या दबावावरुन डी.वाय.पाटील साखर कारखान्याने हवाई अंतराबाबत घेतलेली हरकत फेटाळली गेली आहे. त्यानंतर त्यांनी स्वतः केलेल्या तक्रारीनंतरही त्यांच्या हाती काहीही लागलेले नाही.
> दिल्ली उच्च न्यायालयाने वेळ फुकट घालविल्याबद्दल 25000 रुपयांचा दंड ही त्यांना केला आहे. केंद्र व राज्य शासनाने प्रतिज्ञापत्र सादर केल्याने आपली हार होणार हे लक्षात आल्याने जनतेला भ्रमित करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे.
>आमच्या कारखान्याचा विविध पदांसहित आकृतिबंध 688 इतका आहे. तसेच कारखान्यामुळे अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. 688 पदांकरीता हजारो अर्ज आमच्याकडे आले. कोणत्याही आस्थापनेत उपलब्ध पदानुसार अर्ज स्विकारुन मुलाखतीवेळी योग्य उमेदवारांची निवड केली जाते. इच्छुक सर्वानाच समाविष्ट करून घेता येत नाही. हे आमदार नीतेश राणे यांना माहीत असायला हवे. त्यांनी रोजगार मेळावा, नोकरी एक्सप्रेस सारखे उपक्रम राबवून जिल्ह्यातील 25 हजार बेरोजगार तरुणांना नोकऱ्या दिल्याचे जाहिर केले आहे. तर आमच्या कारखान्याकडे 10 हजार अर्जदार आलेच कसे? याचा अर्थ त्यानी बेरोजगारांसाठी काहीच केलेले नाही.
> आमचा साखर कारखाना ही निवडणुकी पुरती घोषणा नव्हती. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आमच्या कारखान्याला कर्ज देवू असे सांगीतले आहे.त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. मात्र, कर्ज फेडून घ्यायच्या अटीवरच शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कर्ज द्यावे. अन्यथा कर्ज देवून काही दिवसात मालक बदलण्यासाठी अर्ज करु नये असेही या प्रसिद्धि पत्रकात म्हटले आहे.