सामाजिक उपक्रमांची बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2015 11:14 PM2015-09-24T23:14:55+5:302015-09-24T23:51:29+5:30
चितारआळीचा राजा : दरवर्षी वेगवेगळे देखावे
प्रसन्न राणे -सावंतवाडी -जिल्हावासीयाचे आकर्षक ठरणाऱ्या चितारआळीच्या राजाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. फक्त गणेशोत्सव म्हणून साजरा न करता या मंडळाने मिळालेल्या निधीतून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन देखावे सादर करीत आहेत.
रौप्य महोत्सवी चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आकर्षक अशा जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत विविध उपक्रम हे मंडळ राबवित असते. तसेच दरवर्षी अत्यंत एकापेक्षा एक असे देखावे उभारून त्यातून समाजप्रबोधन करण्याचे काम गेली २५ वर्षे मंडळ करीत आहे. तर आजही अतिउत्साहात ही कला जपली जाताना दिसत आहे.
चितारआळी येथे १९९० पासून गणेशोत्सव साजरा केला जातो. रंगमंचाच्या उभारणीपासून विसर्जनापर्यंत सारे काही शिस्तबद्ध आणि आखीव-रेखीव पद्धतीने साजरे होते. येथील सर्व रहिवाशांना, त्यांच्या कुटुंबियांना एकत्र येता यावे, या उद्देशाने या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९९१ मध्ये गुरूनाथ वेर्णेकर, विकास नागुळकर, कुशाल सुराणा, प्रकाश पोतनिस, गजानन चितारी, दिलीप वाडकर आदींनी एकत्र येऊन केली. चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पहिल्या काही वर्षात बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गरज म्हणजे मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी लागणारा भव्य सभामंडप उभारणीसाठी वसंतराव केसरकर यांनी पुढाकार घेतला आणि सभा मंडपाची उपलब्धता झाली. सभामंडपाचा प्रश्न सुटल्याने अन्य साधनसामग्रीसाठी स्थानिकांचेही हात सरसावले. सर्वांच्या सहकार्यातून आवश्यक ती साधनसामग्री जमा झाली आणि ‘चितारआळीचा राजा’ ची प्रतिष्ठापना झाली.
मूर्ती पूजनाबरोबर देखाव्यांची परंपरा जपणाऱ्या या मंडळाने यंदा उत्सवाच्या ठिकाणी पौराणिक, आकर्षक असे चलचित्र देखावे सादर केले आहेत. विठ्ठल दर्शन, संत गोरा कुंभार या पौराणिक विषयांवर हालता देखावा तयार केला. हे देखावे पाहण्यासाठी, कर्नाटक, गोवा तसेच जिल्हाभरातूनही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यंदा हे देखावे कलाकार नाना नरसाळे आणि मंगेश धारगळकर यांनी साकारले आहेत. मंडळाचे अध्यक्ष सुरेश भोगटे, उपाध्यक्ष बाबल वाडकर व मंडळाचे कार्यकर्ते दरवर्षी हा उत्सव दिमाखात साजरा करण्यासाठी परिश्रम घेतात. विसर्जनादिवशी चितारआळीच्या राजाची संपूर्ण शहरातून वाजत-गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत आणि नामगजरात मिरवणूक काढली जाते. येथील मोती तलावात गणरायाचे श्रद्धापूर्वक विसर्जन केले जाते.
रौप्य महोत्सवात पदार्पण
भक्तगणांच्या हाकेला धावून अनेक अडीअडचणी सोडवून चितारआळीच्या राजाने यंदा रौप्य महोत्सवात पदार्पण केले आहे. त्यामुळे भक्तगणांच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा अशी ख्याती या चितारआळीच्या राजाची निर्माण झाली आहे.