सूक्ष्म नियोजनाकरीता समिती
By admin | Published: December 4, 2015 10:50 PM2015-12-04T22:50:06+5:302015-12-05T00:19:15+5:30
दीपक केसरकर : जिल्हा नियोजन समिती सभागृहात बैठक
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नैसर्गिक स्त्रोत विकासातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या अंतर्गत सूक्ष्म नियोजन आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांच्या सूचना लक्षात घेवून जिल्हास्तरीय यंत्रणांनी सूक्ष्म नियोजनाकरीता जिल्हास्तरीय यंत्रणांनी परिपूर्ण माहिती सादर करणे आवश्यक आहे, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शास्त्रज्ञ बाळासाहेब दराडे, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटरचे मुंबई येथील विभागप्रमुख विवेकानंद घारे, जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
दीपक केसरकर म्हणाले, सूक्ष्म आराखड्याच्या अनुषंगाने आतापर्यंत झालेल्या बैठकीत प्रत्येक विभागनिहाय चर्चा करण्यात आली आहे. सुक्ष्मच आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी मुख्यालयातून सर्व टीम आलेली आहे. या टीमला सर्व विभागप्रमुखांनी सहकार्य करावे व जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारा सूक्ष्म आराखडा परिपूर्ण बनवावा, असेही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शाश्वत विकास करण्यासाठी प्रत्येक शासकीय योजनांमधील तफावत शोधून ती भरून काढण्यासाठी प्रत्येक विभागानी सूक्ष्म माहिती सादर करावी असे आवाहन राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानच्या संचालक लीना बनसोड यांनी केले. शासनाच्या प्रत्येक विभागाने पूर्ण क्षमतेने जिल्ह्यात कोणत्या नाविन्यपूर्ण योजना राबवता येतील याची माहिती या समितीसमोर सादर करणे आवश्यक आहे.
प्रत्येक घटकाचा सर्वांगीण शाश्वत विकास करण्यासाठी प्रत्येक विभागाने जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपल्या योजनांचे सादरीकरण करणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासन यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच प्रत्येक विभागनिहाय राबविण्यात येणाऱ्या योजनांचा समन्वय साधून विकास होणे गरजेचे आहे. ज्या योजनेसाठी शासनाचा निधी एखाद्या विभागाला प्राप्त होत नाही त्यासाठी या आराखड्याअंतर्गत तरतूद प्रस्तावित करावी, असेही संचालक लिना बनसोड यांनी सूचित केले.(प्रतिनिधी)
घारे : नैसर्गिक साधन संपत्तीचे होणार जतन
जिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व विकासासाठी सर्वदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीचा परिणामकारकरित्या उपयोग करण्यात येणार आहे, असे मत महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरचे मुंबई येथील विभागप्रमुख विवेकानंद घारे यांनी या बैठकीत स्पष्ट केले. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरच्या माध्यसमातून जिल्ह्यातील मृद व जलसंधारण, वन व जैव विविधतेचा अभ्यास, पिकक्षेत्र अंदाज, पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापन, सागर किनारा अभ्यास, शहर विकास त्याचबरोबर इको सिस्टीम संतुलनात होणाऱ्या बदल नोंदीसाठी दुहेरी लक्ष ठेवण्यात येणार आहे.
एक व्यक्ती कायमस्वरूपी ठेवणार
जिल्ह्यात या सेंटरची एक व्यक्ती कायमस्वरूपी ठेवण्याचाही विचार असल्याचे मत महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरचे मुंंबई येथील विभागप्रमुख विवेकानंद घारे यांनी व्यक्त केले.