पोलीस कस्टडीतील मृत्यू रोखण्यासाठी समिती - दीपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 10:12 PM2017-11-19T22:12:34+5:302017-11-19T22:12:58+5:30
सावंतवाडी - सांगली येथील घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, पोलीस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती येत्या पंधरा दिवसात शासनाला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी त्यांनी आंबोलीसाठी स्वतंत्र असे टुरिझम पोलीस ठाणे तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव शासनाने मागविला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री दीपक केसरकर हे रविवारी शासकीय बैठकीसाठी सावंतवाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, आरोग्य अधिकारी योगेश साळे, तहसीलदार सतीश कदम, रूपेश राऊळ आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, सांगली येथील घटनेनंतर शासन पोलीस कस्टडीतील मृत्यू रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय करीत आहेत. त्यासाठी मुंबईत वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची एक बैठक झाली. या बैठकीत पुढील पंधरा दिवसात कस्टडीतील मृत्यू रोखण्यासाठीच्या उपाययोजना आखण्याबाबत आदेश दिले आहेत. हा अहवाल आल्यानंतर शासन त्यांच्यावर उचित असा निर्णय घेईल, असे मंत्री केसरकर म्हणाले. तसेच अहमदनगर घटनेबाबतही एखाद्या शेतकºयावर गोळीबार करणे चुकीचे आहे. पण अशी आंदोलने होत असतील, तर त्यातून मार्ग काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी बैठक घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे. गोळीबारापर्यंत विषय येऊ नये याची काळजी घ्या, अशा सूचना करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
आंबोली येथील कावळेसाद पॉर्इंट येथील दरीत चार मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेची दखल घेत आम्ही आंबोलीत आणखी एक तपासणी नाका लावण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे हा नाका लावण्यात आला आहे. तसेच गस्तही वाढविण्यात आली आहे. मात्र एवढ्यावरच शासन थांबणार नाही, तर माथेरान तसेच अन्य पर्यटन स्थळांवर ज्या प्रमाणे स्वतंत्र पोलीस ठाणी आहेत, तसे पोलीस ठाणे आंबोलीत निर्माण करण्यात येणार आहे. हे पोलीस ठाणे पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे असल्याने ‘टुरिझम पोलीस’ ही संकल्पना आंबोलीत रूजविण्यात येईल, असेही यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून मागविण्यात आला आहे. तो प्रस्ताव आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येईल व लवकरात लवकर त्याची मंजुरी घेऊ, असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापूर येथील महिला पोलिस अधिकारी गेले दीड वर्ष बेपत्ता आहे. त्याबाबत माझ्याकडे रितसर तक्रार आली तर त्यावर अधिक भाष्य करेन, असे सांगत याची मी स्वत: माहितीही घेईन आणि यात काय करता येईल हे तपासून बघितले जाईल, असे यावेळी मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.