सांघिकतेने साधली आर्थिक उन्नती मळगावच्या दोन पूर्वस बचत गटाची किमया :
By admin | Published: September 17, 2016 11:10 PM2016-09-17T23:10:04+5:302016-09-18T00:01:41+5:30
मच्छी, कुळीथ पीठ, तांदूळ, सौंदर्य प्रसाधने विक्रीतून मिळविला नफा --महिलांचा बचतगट ६८
सावंतवाडी : महिलांच्या हाती रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, अशी संकल्पना मनात आणून महिलांना एकत्रित आणत बचतगटाची स्थापना करण्यात आली. अत्यंत प्रभावीपणे आपली कामगिरी बजावून गटातील प्रत्येक महिलेला रोजगार मिळून सांघिकतेतून प्रगती करण्याची किमया दोन पूर्वस स्वयंसहाय्यता महिला बचतगटाने केली आहे.
मळगाव कुंभार्ली-तेलकाटावाडी येथील दोन पूर्वस स्वयंसहाय्यता महिला बचतगटाची स्थापना १९ जुलै २०१४ रोजी ओंकार तुळसुलकर यांच्या समक्ष करण्यात आली. दारिद्र्यरेषेखालील दहा महिला गोळा करून बचतगटाला सुरुवात करण्यात आली.
महिला सक्षमीकरणासाठी एकत्रित येत स्थापन केलेल्या या बचतगटातील सर्व महिला एकदिलाने, मनाने गेली दोन वर्षांपासून यशस्वीरीत्या वर्षाचे बारा महिने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात.
त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी वेळोवेळी महिलांना एकत्रित आणून महिला संघटन करण्याचे काम अत्यंत प्रभावीपणे या सर्व महिला करीत असतात.
सुरुवातीला १०० रुपये प्रतिमहा अशी वर्गणी काढून कार्याला सुरुवात केली. या पैशाची बचत केली. त्यानंतर पंधरा हजार रुपये फिरता निधी या बचतगटाला मिळाला. तसेच कॅनरा बँकेतून ५० हजार रुपये कर्ज घेतले.
तसेच पाणलोट समितीद्वारे २५ हजार रुपयेही या महिलांना मिळाले. मिळणारे पैसे महिलांनी वाटून घेत विविध व्यवसायाला सुरुवात केली. कर्जाची परतफेड करून बँकेतही आपल्या गटाचे वजन निर्माण केले आहे.
कुळीथ पीठ, मासे विक्री, तांदूळ, कोकम आगळ, सौंदर्य प्रसाधने अशा प्रकरच्या विविध वस्तूंची विक्री अशा प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय या बचतगटातून होत असतात. तसेच तयार केलेल्या साहित्याची विक्री सावंतवाडी शहराबरोबरच जिल्ह्यातही केली जाते. यातून येणारा फायदा दर एक वर्षाने बचतगटातील महिलांना वाटप केला जातो. यामध्येही आजपर्यंत महिलांनी विश्वासार्हता जपली आहे.
त्याबरोबरच सावंतवाडीत कोकण, सरस, सावंतवाडी सुंदरवाडी महोत्सव तसेच मळगाव गावात होणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा अशा कार्यक्रमातही विविध प्रकारचे स्टॉल या बचतगटांनी लावून रोजगार साधन उपलब्ध केले होते.
या बचत गटात अध्यक्षा विजया विजय गवंडे, उपाध्यक्ष दीपाली दिलीप राऊळ, सचिव मानसी मंगेश निवजेकर, सदस्य यशोदा यशवंत ठाकर, गायत्री संतोष गावडे, माधुरी मोहन गवंडे, सावित्री बाबी गोसावी, निशा श्रीनिवास नाटेकर, लक्ष्मी लक्ष्मण राऊळ, रेश्मा धर्मनाथ गोसावी यांचा समावेश आहे.
(प्रतिनिधी)