नुकसानभरपाई हायजॅक

By admin | Published: December 4, 2014 10:59 PM2014-12-04T22:59:15+5:302014-12-04T23:49:58+5:30

वसंत सरवणकर यांचा आरोप : देवगड पंचायत समिती सभा

Compensation Hijack | नुकसानभरपाई हायजॅक

नुकसानभरपाई हायजॅक

Next

देवगड : आंबा नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमांचे पुढे काय होते याचे प्रातिनिधीक स्वरूपातील एक प्रकरण माजी सभापती वसंत सरवणकर यांनी सभागृहापुढे आणताच तालुका कृषी कार्यालयाचा भोंगळ कारभार सर्वांच्या नजरेसमोर आला.
देवगड पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये गुरुवारी दुपारी वसंत सरवणकर यांनी फणसगांव परिसरातील एका शेतकऱ्याची नुकसानभरपाई म्हणून सरकारतर्फे त्याला देण्यात आलेला सहा हजारांचा चेक तालुका कृषी विभागाने चक्क हायजॅक केल्याचा खळबळजनक आरोप केला.
आजतागायत या चेकचे पुढे काय झाले, तो शेतकऱ्याला का मिळाला नाही याचे समाधानकारक उत्तर तालुका कृषी विभागाकडे नसल्याचे या घटनेने सिद्ध झाले. यावेळी व्यासपीठावर सभापती डॉ. मनोज सारंग, उपसभापती स्मिता राणे व गटविकास अधिकारी विजय चव्हाण उपस्थित होते.
देवगड तालुक्यामध्ये पंचायत समिती सभापती डॉ. मनोज सारंग, उपसभापती स्मिता राणे व गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनाही औपचारिक आमंत्रण न देता व मूठभर शेतकरी व तब्बल २८ कर्मचारी घेऊन देवगडमध्ये आंबा पीक नियोजनावर कृषी मेळावा घेण्याचा देखावा करणाऱ्या तालुका कृषी विभागाला जवळजवळ सर्वच पंचायत समिती सदस्यांनी धारेवर धरले. या संदर्भात विरोधी गटनेते संतोष किंजवडेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. तालुका कृषी अधिकारी परब यांच्या अनुपस्थितीत त्यांचे प्रतिनिधी सभागृहात केवळ तोंड दाखवून गायब झाल्यानेही सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अखेर बऱ्याच वेळानंतर हे प्रतिनिधी उपस्थित झाले व झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी सभागृहाची माफी मागितली. अखेर हा मेळावा परत घेण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने मान्य केल्यावरच सभासद शांत झाले. यावेळेच्या चर्चेत वसंत सरवणकर, रवींद्र जोगल, संतोष किंजवडेकर यानी प्रामुख्याने भाग घेतला.
देवगड पंचायत समिती कार्यक्षेत्रातील खाडीपलिकडच्या भागाला सापत्न वागणूक मिळत असल्याबद्दल वसंत सरवणकर व दीप्ती घाडी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून गेले वर्षभर विजयदुर्ग विभागाला शालेय पोषण आहार योजनेंतर्गत धान्य पुरवठा होत नसल्याबद्दल दीप्ती घाडी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व आवाज उठवला. धान्याचे पैसे भरूनही पुरवठा होत नसेल तर विजयदुर्ग विभागासाठी वेगळ्या तालुक्याची मागणी करावी का? असा संतप्त सवाल यावेळी सरवणकर यांनी केला.
जिल्हा नियोजन आराखड्यामध्ये कृषी विभागासाठी एक कोटींची तरतूद करावी अशी सूचना सदस्य प्रकाश गुरव यांनी मांडली.
देवगड पंचायत समितीतर्फे किंवा जिल्हा परिषदेतर्फे वाटप करण्यात आलेल्या सौर कंदिलांची गुणवत्ता निकृष्ट आहे व ते दुरुस्त करण्यापलिकडे गेलेले असल्याचा आरोप वसंत सरवणकर यांनी केला. पंपाच्या बाबतीतही हीच परिस्थिती असून अशा निकृष्ट पंपांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याची बाब संतोष किंजवडेकर यांनी पुढे आणली. पॉवर टिलर मंजूर होऊन व शेतकऱ्यांना विकत घेऊनही त्याचे पैसे अदा करण्यास कृषी विभाग टाळाटाळ करीत असल्याचा आरोप वसंत सरवणकर यांनी
केला. (प्रतिनिधी)


‘सीआरझेड’ची नियंत्रणरेषा स्पष्ट करा
देवगड तालुक्यातील ग्रामपंचायतींनी परवानगी दिलेली असतानाही महसूल विभाग शेतकऱ्यांच्या घरांना बेकायदेशीर ठरवून ती पाडण्याचा घाट घालत असल्याबद्दल पंचायत समिती सदस्य वसंत सरवणकर यांनी संताप व्यक्त केला. या संदर्भात खाडीकिनारी व समुद्रकिनारी कोणत्या मर्यादेपर्यंत घर बांधणी वैध आहे हे दर्शविणारी स्पष्ट रेषा नकाशावर नसल्याने हा गोंधळ होत आहे. म्हणून टाऊन प्लॅनिंगतर्फे खाडीकिनारच्या व समुद्रकिनारच्या सीआरझेड मर्यादा स्पष्ट करणारी रेषा नकाशावर स्पष्ट करण्याची
मागणी एका ठरावाद्वारे करण्यात आली. हा ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून स्पष्टीकरण व्हावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.


६ गावे प्रभावित
अवकाळी पावसामुळे तालुक्यात ६ गावांमधील ७.५ हेक्टर क्षेत्राखालील १२८ शेतकरी प्रभावित झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
दोन मिनिटे स्तब्धता पाळून माजी मुख्यमंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मितीत महत्वाचा वाटा असलेल्या बॅ. ए. आर. अंतुले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Web Title: Compensation Hijack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.