मूळ किंमतीचे विवरणपत्र न मिळाल्यास मोबदला स्विकारणार नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 02:39 PM2020-12-08T14:39:12+5:302020-12-08T14:41:11+5:30
Dam, collectoroffice, Kankavli, Sindhudurgnews जोपर्यंत मोबदल्याबाबतचे मूळ किंमतीचे विवरणपत्र आम्हाला मिळत नाही , तोपर्यंत मोबदला रक्कम न स्विकारण्यावर प्रकल्पग्रस्त ठाम असल्याची माहिती नरडवे धरणग्रस्त समितीचे संतोष सावंत यांनी दिली आहे .
कणकवली : नरडवे धरण प्रकल्पग्रस्तांना मूळ किंमत व आताची वाटप कींमत याची प्रत द्या , असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी कदम यांना दिले आहेत . मात्र , त्यानंतरही याबाबतची कार्यवाही करण्यास कदम यांनी नकार दिला आहे . त्यामुळे जोपर्यंत मोबदल्याबाबतचे मूळ किंमतीचे विवरणपत्र आम्हाला मिळत नाही , तोपर्यंत मोबदला रक्कम न स्विकारण्यावर प्रकल्पग्रस्त ठाम असल्याची माहिती नरडवे धरणग्रस्त समितीचे संतोष सावंत यांनी दिली आहे .
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नरडवे धरणग्रस्त समन्वय समितीतर्फे शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यासमवेत सोमवारी प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची भेट घेण्यात आली . मोबदला वाटपाबाबत मूळ किमतीचे विवरणपत्र मिळत नाही , तोपर्यंत मोबदला वाटप करू नये , अशी यावेळी आम्ही धरणग्रस्तांनी त्यांच्याजवळ मागणी केली .
यावेळी समितीचे अध्यक्ष सुरेश ढवळ , लुईस डिसोजा , संतोष सावंत , प्रकाश सावंत . हनुमान शिंदे , अशोक जाधव, मधुकर शिंदे यांच्यासह अन्य नरडवे धरण ग्रस्त उपस्थित होते.
यावेळी प्रकल्पग्रस्तांनी मंगेश जोशी यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली . लघु पाटबंधारे विभाग यांच्याकडून मिळालेल्या नोटिसीमध्ये मालमतेची मूळ रक्कम किती आहे ? हे समजत नाही . मोबदला वाटपात प्रचंड तफावत दिसत आहे . परिणामी धरणग्रस्तांचे नुकसान होणार आहे . त्यामुळे मूळ किमतीचे विवरणपत्र दिल्याशिवाय मोबदला वाटप करु नये , अशी मागणी आम्ही प्रकल्पग्रस्तांनी केली .
प्रकल्पग्रस्तांना वाटप करावयाच्या रकमेचे मूळ किमतीचे विवरणपत्र मिळाले पाहिजे . तसेच याप्रक्रियेत पारदर्शकता असायला हवी . मात्र , तसे न करता वाटप प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे .त्याला आमचा विरोध असल्याचेही प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले असल्याचे संतोष सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
-- फोटो ओळ - सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात नरडवे धरणग्रस्तांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी संदेश पारकर उपस्थित होते.