पश्चिमेची आंब्याशी स्पर्धा

By admin | Published: December 18, 2014 09:12 PM2014-12-18T21:12:00+5:302014-12-19T00:24:22+5:30

फेरफटका...

Competition with western mangoes | पश्चिमेची आंब्याशी स्पर्धा

पश्चिमेची आंब्याशी स्पर्धा

Next

कोकणात सध्या आंबा आणि पाण्याचा विषय गाजतो आहे. रत्नागिरी हापूसची अवीट गोडी व त्याला प्रथमच पश्चिम महाराष्ट्रातून झालेली स्पर्धा हा कुतुहलाचा विषय ठरला आहे. दरवर्षी रत्नागिरीतून हापूसची स्वारी परदेशात जाते. यंदाही ही स्वारी रवाना होणार असली तरी यामध्ये आपली ओळख व्हावी, यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून प्रथमच स्पर्धा झाली. जुन्नरमधून हापूस तयार करुन त्याची चार डझनाची पेटी मुंबईमध्ये गेली. देवगड, रत्नागिरी या हापूसचा स्वाद जगाने प्रेम करावा असा आहे. मात्र, या व्यवसायात सध्या अघोरी स्पर्धा सुरू आहे.
आंब्याच्या उलाढालीत कोकणच्या शेतकऱ्याचे अर्थकारण गुंतलेले असते. चार महिने या क्षेत्रात बागायतदार व्यावसायिकदृष्ट्या उतरलेले असतात, तर संपूर्ण वर्षभर बागायतीवर अवलंबून असलेले ग्रामीण भागातील छोटे-मोठे शेतकरी आपली वर्षाची निकड यातून काढण्याचा प्रयत्न करत असतात. कोकणात आंब्याचे उत्पादन हे देशभरातील इतर कोणत्याही राज्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळेच जगभरातून पर्यटक अथवा कोणताही परदेशी पाहुणा आला की, तो आंब्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहात नाही. सध्या या पिकामध्ये तंत्रज्ञानाची भर पडली आहे. कल्टारचा वापरही अधिक प्रमाणावर केला जातो. आंब्याची वाढ व आंब्याचे पीक या दोन्ही गोष्टी संबंधित बागायतदार शेतकरी जीवापाड जपत असतो. यातच अनेक बँकांचे सहकार्य या विषयाला घेतल्यामुळे त्याचा परतावा वेळेत कसा देता येईल, याचा विचारही महत्त्वाचा मानला गेला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणच्या हापूसची लोकप्रियता पश्चिमेकडील काही बागायतदारांना कदाचित सलत असावी, या हेतूनेच जगाच्या कोपऱ्यात आपलेही स्वतंत्र ब्रॅण्डिंग व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात उसाचे पीक अधिक असते. आता तेथील शेतकरी कृषी विद्यापीठाच्या मदतीने आंब्याचे प्रयोग करु लागला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात विजय मेहता कुलगुरु असताना या भागातील नारळ व आंबा शिरोळच्या रत्नाप्पा अण्णा कुंभार यांनी कारखाना परिसरात कसा लावला होता, याचे वर्णन करत व पश्चिम महाराष्ट्रात कोकणकडे शेतीतील उत्पादन देणाऱ्या स्वतंत्र जातीबाबत कसा आपुलकीने पाहात असे, या गोष्टी सांगत असत. याच्यामध्ये स्पर्धा जरुर होती. मात्र, त्यामध्ये आपला भाग कोकणच्या पुढे जावा व या क्षेत्रात दबाव गट निर्माण करावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली नव्हती. दुर्दैवाने गेल्या आठवड्यात माध्यमांमधील बातम्या वाचल्यानंतर जुन्नर असो अथवा सातारा-सांगलीकडील गाव असो या भागात हापूसची आपली अशी स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला आहे. इतकेच नव्हे; तर मुंबईत खपला जाणारा आंबा अथवा विक्रीसाठी ठेवला जाणारा आंबा हा रत्नागिरी हापूस म्हणून विकला जातो. तो आता आपल्या भागाचा आंबा म्हणून समोर यावा, अशी काहींची इच्छा आहे.
कोकणात रत्नागिरी, देवगड या दोन भागांनी कित्येक वर्षे हापूसचा स्वाद जगाला दिला आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी या मातीचा गुण आंब्यामध्ये चवीच्या रुपाने येतो आहे. तंत्र विकसित झाले असले तरी बाहेरुन येणारा पाहुणा हा रत्नागिरी हापूसची ओळख विसरु शकत नाही. आंब्यामधील रेषांचा अभ्यास हा अनेकवेळा त्याची ओळख स्पष्ट करतो.
कोकणातील आंब्यावर निसर्गाची अवकृपा झाली तरी येथील शेतकरी आपला स्वाभिमान गहाण ठेवत नाही. किंबहुना एखाद्या वर्षी पिकाने दगा दिला असला तरी त्याचे दु:ख पचवत तो पुढील वर्षी नव्या दमाने उभा राहातो व शेती-बागायतीतील आपली ओळख स्वतंत्रच ठेवत असतो.
हापूसमध्ये अनेक जाती विकसित करण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. कृषी तंत्रज्ञान या भागातील जमिनीचा कस व त्यावर पिकामध्ये येणारे गुण-दोष शोधून काढले आहेत. गेल्या १५ वर्षांत या भागात हापूसची निर्यातही मोठ्या प्रमाणावर होत असली तरी दलालीचा शाप जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आव्हाने कायम राहतील. शेतकरी, बागायतदारांना आंबा शिकवतो, सुचवतो व जगायला प्रेरणा देतो.
- धनंजय काळे--

Web Title: Competition with western mangoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.