टॅग लावलेल्या जनावरांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 05:51 PM2021-01-07T17:51:34+5:302021-01-07T17:55:35+5:30
wildlife sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख १४ हजार जनावरांना पायलागचे लसीकरण आणि टॅग लावण्यात आले असून, हे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. याची माहिती ऑनलाईन नोंद करणे आवश्यक आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे अद्याप केवळ टॅग लावलेल्या ३९ हजार ३१० जनावरांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन समिती सभेत देण्यात आली.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख १४ हजार जनावरांना पायलागचे लसीकरण आणि टॅग लावण्यात आले असून, हे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. याची माहिती ऑनलाईन नोंद करणे आवश्यक आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे अद्याप केवळ टॅग लावलेल्या ३९ हजार ३१० जनावरांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन समिती सभेत देण्यात आली.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीची सभा सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप शिंपी, सदस्य रोहिणी गावडे, मनस्वी घारे, सुनील पारकर, आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील जनावरांना पायलाग लसीकरण व टॅग लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख १४ हजार जनावरांना टॅग लावणे व पायलाग लसीकरण पूर्ण केले आहे. हे काम १०० टक्के पूर्ण झाले. मात्र, टॅग लावलेल्या जनावरांची ऑनलाईन नोंदणी करण्यास येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे आतापर्यंत ३९ हजार ३१० जनावरांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्याचे दिसत आहे, अशी माहिती सभेत देण्यात आली.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ जनावरे पुरविणे, कुक्कुट पिले पुरविणे, कडबाकुट्टी योजना राबविण्यात येत आहे. या योजनांसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करा, अशा सूचना सभेत देण्यात आल्या. तर आंबोली पशुवैद्यकीय दवाखान्यासह जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त पदे भरण्याबाबत तत्काळ कार्यवाही करा, अशी सूचना सदस्य रोहिणी गावडे यांनी केली..
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत बदल
पशुवैद्यकीय दवाखान्यांची कामकाजाची वेळ सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ५ अशी होती. त्यामध्ये आता शासनाने बदल करण्याचा निर्णय घेतला असून, नवीन शासन आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४.३०, तर शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत पशुवैद्यकीय दवाखाने सुरू राहतील. अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये दुपारी १ ते १.३० ही जेवणाची वेळ असेल. असे नमूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप शिंपी यांनी दिली.