राजापुरात ६९ ठिकाणचे पंचनामे पूर्ण
By Admin | Published: April 29, 2015 10:12 PM2015-04-29T22:12:29+5:302015-04-30T00:30:58+5:30
अवकाळी पाऊस : आतापर्यंत साडेचार लाखांच्या नुकसानीची नोंद
राजापूर : दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील ६० ते ७० गावांना जबरदस्त तडाखा देणाऱ्या चक्रीवादळातील नुकसानाची पाहणी करत त्याचे पंचनामे करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर जोरात सुरू असून बुधवारी दुपारपर्यंत एकूण ६९ ठिकाणचे रितसर पंचनामे झाले होते. त्या ठिकाणी झालेल्या नुकसानाची आकडेवारी ही ४ लाख ६६ हजार ७०२ एवढी होती. आणखी शंभरहून अधिक ठिकाणच्या पंचनाम्याची आकडेवारी तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाली नव्हती.
सोमवारी सायंकाळी उशिरा तालुक्यातील पाचल, कोंड्ये, सौंदळ, हसोळतर्फे सौंळ या तलाठी सजातील अनेक गावांना तुफानी चक्रीवादळाचा व मुसळधार पावसाचा तडाखा बसला होता. या वादळात अनेक ठिकाणी घरांची, गोठ्यांची कौले व पत्रे उडून तर अनेक ठिकाणी घरांवर लगतची झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
अचानक आलेल्या या वादळाने तालुुक्याला चांगलाच हादरा दिला असून दुर्घटनाग्रस्त गावातील पडझडीतून तेथील ग्रामस्थ अद्याप सावरलेले नाहीत. मात्र, त्या घटनेनंतर देखील ढगाळ वातावरण कायम राहिल्याने अधिक नुकसान होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घेताना अनेकांनी आपापली उडालेली छप्परे पुन्हा शाकारायला सुरुवात केली. बुधवारी दिवसभर तेच काम कायम सुरु होते.
तालुक्यातील केळवली, मोरोशी, ससाळे, गोठणे दोनिवडे भागात झालेल्या नुकसानाचे ६१ पंचनामे करण्यात आले असून एकूण ४ लाख ६६ हजार ७०२ एवढे नुकसान झाल्याचा अहवाल तयार झाला आहे. उर्वरित नुकसानग्रस्त गावातील पंचनाम्यांची आकडेवारी अद्याप तहसील कार्यालयापर्यंत पोहोचलेली नसून आणखी किमान १०० च्या आसपास पंचनाम्यांची आकडेवारी अपेक्षित आहे.
दरम्यान तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे हे स्वत: जातीनिशी लक्ष ठेवून असून त्यांनी वेळोवेळी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. आगामी एक दोन दिवसात संपूर्ण तालुक्यातील झालेल्या नुकसानाचे पंचनामे व त्याची आकडेवारी तहसील कार्यालयाकडे प्राप्त होणार आहे.
मागील अनेक वर्षात राजापूर तालुक्याला असा वादळाचा फटका कधी बसला नव्हता. पंधरा दिवसापूर्वी रायपाटण या गावाला वादळाने झोडपून काढले होते. (प्रतिनिधी)
ग्रामस्थ संतप्त
केळवली या गावात शासकीय यंत्रणा उशिराने दाखल झाल्याने तेथील संतापलेल्या काही ग्रामस्थांनी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांना पंचनामा करण्यापासून रोखले. त्यामुळे चांगलाच पेचप्रसंग उद्भवला. अखेर तहसीलदार गुरूनाथ हुन्नरे हे पोलीस संरक्षण घेऊन केळवली गावात हजर झाले. त्यानंतर स्वत: तहसीलदार हुन्नरे यांनी समस्त ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत त्यांची समजूत काढली व नंतर राहिलेले पंचनामे महसूलच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केले.