सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम पूर्ण करा; दीपक केसरकर यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 10:54 PM2023-12-28T22:54:13+5:302023-12-28T22:54:38+5:30
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली.
सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे काम पूर्ण करा तसेच अमृत भारत स्टेशन’ आणि ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेमध्ये सावंतवाडी स्थानकाचा समावेश करा अशा विविध मागण्या घेऊन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्ली दरबारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.व या सर्व मागण्या मान्य करून घेत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेला दिलासा देण्यात आला आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी मंत्री वैष्णव यांनी मंत्री केसरकर यांच्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण करणे, केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन’ आणि ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेमध्ये सावंतवाडी स्थानकाचा समावेश करणे, सावंतवाडी स्थानकामध्ये पूर्ण वेळ पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टिम सुविधा सुरू करणे आदींसह विविध रेल्वेगाड्यांना सावंतवाडी येथे थांबा देणे अशा सर्व मागण्या तत्त्वतः मान्य केल्या व याबाबत कार्यवाहीच्या सूचना रेल्वे प्रशासनास दिल्या. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या (केआरपीए) मागण्यांच्या अनुषंगाने मंत्री केसरकर यांनी मंत्री वैष्णव यांच्याकडे याबाबतची विनंती केली होती.
सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे काम निधीअभावी थांबले आहे. यासाठी आवश्यक असलेला नऊ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून कामाला गती द्यावी, अशी विनंती मंत्री केसरकर यांनी केली होती. यास रेल्वेमंत्री वैष्णव यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. कोकणातील प्रवाश्यांना अधिक चांगली सुविधा मिळावी यादृष्टीने सावंतवाडी स्थानकाचा केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन’ आणि ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीला देखील तत्काळ प्रतिसाद देत वैष्णव यांनी मान्यता दिली. सर्व प्रवाशांबरोबरच विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाश्यांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरणारी पूर्ण वेळ प्रवाशी रिझर्वेशन सिस्टिम सावंतवाडी स्थानकावर सुरू करण्यास देखील त्यांनी मान्यता दिली.