तेरा गावांतील मालमत्ता सर्वेक्षण पूर्ण
By admin | Published: August 31, 2015 09:30 PM2015-08-31T21:30:37+5:302015-08-31T21:30:37+5:30
महामार्ग चौपदरीकरण : संपूर्ण मार्गाला सर्व्हिस रोड
कणकवली : महामार्ग चौपदरीकरणांतर्गत भूसंपादनामध्ये काही मालमत्ता जाणार आहे. जिल्ह्यातील २२ गावांपैकी आतापर्यंत तेरा गावांमधील अशा मालमत्तचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अद्याप झाडांच्या मोजणीचे काम बाकी आहे, अशी माहिती प्रांताधिकारी संतोष भिसे यांनी दिली. महामार्ग चौपदरीकरणांतर्गत ग्रामीण भागात ६० मीटर आणि शहरांतर्गत ४५ मीटरचे भूसंपादन केले जाणार आहे. या चौपदरीकरणात होणाऱ्या भूसंपादनात काही मालमत्ता जाणार आहेत. त्याचे सर्वेक्षण केले जात आहे. चौपदरीकरणांतर्गत जिल्ह्यात महामार्गावरची २२ गावे येत असून त्यापैकी आतापर्यंत तेरा गावांमधील अशा मालमत्तेचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. अन्य गावांमधील सर्वेक्षण सुरू आहे. नडगिवे, तळेरे, आनंदनगर, उत्तर-दक्षिण गावठाण, जांभळगाव, नागसावंतवाडी, असलदे, नांदगाव, बेळणे खुर्द, हुंबरठ, कणकवली, वागदे आणि ओसरगांव या गावांतील मालमत्तेची मोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ८७ घरे, १५९ दुकानगाळे, ६० पडव्या, ३७ खोके, २२ विंधनविहिरी, २६ विहिरी, ६ सेप्टीक टॅँक, १३ पाण्याच्या टाक्या, ५३ शेड, २१ शौचालये, ६ गोठे, ११ स्टोअररूम आणि किरकोळ प्रकारची ७३८ एवढी मालमत्ता जात आहे. कणकवली शहरातील ३१ घरे, ९७ गाळे, ९ पडव्या, १६ खोके, ५ विंधनविहिरी, ४ विहिरी, २ टाक्या, ३६ शेड, १ शौचालय, २ स्टोअररूम, इतर १५ अशा मालमत्तेचा यात समावेश आहे. तर तळेरेतील १६ आणि आनंदनगरमधील १४ दुकानगाळ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
पूर्ण मार्गाला सर्व्हिस रोड
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात महामार्गाला सर्व्हिस रोड ठेवण्याची अट असते. त्याप्रमाणे सर्व मार्गाला समांतर सर्व्हिस रोड ठेवण्यात येणार आहे. जेथे ४५ मीटर रूंदीकरण होणार आहे. अशा ठिकाणीही सर्व्हिस रोड होणार आहे. अशी माहिती देण्यात आली.
हरकती नोंदवल्या
महामार्ग चौपदरीकरणाचा ढोबळ आराखडा तयार झाला आहे. गावातून महामार्गावर जोडणाऱ्या मार्गाच्या संदर्भात संबंधित ग्रामपंचायतींना हरकती नोंदवण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे हरकती नोंदवण्यात आल्या आहेत, असे प्रांताधिकारी संतोष भिसे यांनी सांगितले.