आरोसबाग पुलाचे काम लवकरच पूर्ण
By admin | Published: January 23, 2016 11:11 PM2016-01-23T23:11:48+5:302016-01-24T00:39:02+5:30
चंद्रकांत पाटील : बांदा येथे लोकोत्सव २0१६ चे उद्घाटन
बांदा : शहरातील सुविधा गावात निर्माण झाल्यास गावातील तरुण शहराकडे जाणार नाही. त्याच धर्तीवर बांदा शहराचा विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. गेली कित्येक वर्षांची मागणी असलेला आरोसबाग येथील पुलाला नाबार्डमधून निधी मंजूर केल्याने या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा मानस आहे. तसेच शहरातील प्रस्तावित क्रीडा संकुल व सुसज्ज विश्रामगृहाच्या इमारतीचे काम देखिल लवकरच सुरु करण्याचे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, सहकार, पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांदा येथे दिले.
भारतीय जनता पार्टीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकोत्सव २0१६’ च्या उद्घाटन समारंभात मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, राजन म्हापसेकर, काका कुडाळकर, तालुकाध्यक्ष मनोज नाईक, श्वेता कोरगावकर, सरपंच मंदार कल्याणकर, उपसरपंच बाळा आकेरकर, शितल राउळ, प्रियांका नाईक, अशोक सावंत, सनी काणेकर, श्यामकांत काणेकर, लोकोत्सव समितीचे अध्यक्ष सुधीर शिरसाट, उमेश फातरफोड आदि मान्यवर उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक मंदार कल्याणकर यांनी केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी लोकोत्सव समितीच्यावतीने मंत्री पाटील यांचा व राष्ट्रीय पातळीवर वक्तृत्व स्पर्धेतील यश मिळविलेल्या चैतन्या सावंत व दुर्गाराम जोशी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
मंत्री पाटील म्हणाले की, सरकारच्या अच्छेदिनची टिंगल करण्यात येते. मात्र, काँग्रेस शासनाने १५ वर्षात राज्यावर ३ लाख ५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा ठेवला असून राज्याला महिन्याला यासाठी २३ हजार कोटी रुपयांचे व्याज भरावे लागते. त्यामुळे अच्छे दिन येण्यासाठी सरकारला वेळ द्या. जनतेला निश्चितच अच्छे दिन येतील.
जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ५ हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यामुळे कोकणसाठी अच्छे दिन येणार आहेत. मोपा विमानतळामुळे बांद्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. यावेळी अतुल काळसेकर, रविंद्र चव्हाण यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन अक्षय वाटवे यांनी केले. आभार बाळा आकेरकर यांनी
मानले. (प्रतिनिधी)