बहुजन क्रांती मोर्चाला संमिश्र प्रतिसाद
By admin | Published: January 8, 2017 11:33 PM2017-01-08T23:33:35+5:302017-01-08T23:33:35+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक : विविध घोषणा देत मागण्यांकडे वेधले लक्ष
सिंधुदुर्गनगरी : मराठा क्रांती मोर्चानंतर रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध समाजाच्या संघटनांनी बहुजन क्रांती मोर्चा काढून प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. ओरोस येथील गोविंद मार्केट येथून (सभास्थळ) विविध घोषणा देत निघालेला मोर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. जिल्ह्यातील काही समाज संघटनांनी या मोर्चात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने पोलिस प्रशासनाच्या माहितीनुसार या मोर्चात सुमारे ८०० बहुजन उपस्थित होते. त्यामुळे या मोर्चास संमिश्र प्रतिसाद मिळाला. संयोजन समितीने रविवारच्या या मोर्चास जिल्ह्यातून दीड लाख बहुजन उपस्थित राहतील, असा अंदाज बांधला होता. मात्र, मोर्चा यशस्वी झाल्याचा दावा समन्वय समितीने केला आहे.
मोर्चापूर्वी गोविंद मार्केट येथे झालेल्या सभेत वक्त्यांनी अॅट्रॉसिटी कायदा कडक करा, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, अशा विविध मागण्या केल्या. अनेक वक्त्यांनी फडणवीस सरकार व संघ यांच्यावर जोरदार टीका केली. संघ मराठा व दलित यांच्यात भांडण लावू पाहत असल्याचा आरोपही समितीचे पदाधिकारी भालेराव यांनी केला.
रविवारी झालेल्या बहुजन समाजाच्या मोर्चात सहभागी होण्याची साद समन्वय समितीने घातल्यानंतर हजारोंनी बहुजन मोर्चासाठी गोळा होतील असा अंदाज बांधत सकाळी ८ वाजल्यापासूनच सिंधुदुर्गनगरीला पोलिस छावणीचे रूप आले होते. मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी बॅरेकट उभारुन पोलिस यंत्रणा सज्ज झाली होती.
सावंतवाडी उपविभागातील पोलिस अधिकारी दयानंद गवस यांच्या मार्गदर्शनाखाली २० पोलिस, २० वाहतूक पोलिस, दोन जलद कृती दल पथक, १० पोलिस अधिकारी, बॉम्बशोधक पथक तैनात करण्यात आले होते. सभास्थळ, ओरोस फाटा, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मोर्चाच्या मार्गावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी १० वाजल्यापासून सभास्थळाच्या ठिकाणी बहुजन गोळा होण्यास सुरुवात झाली होती. प्रत्यक्षात ११ वाजता मोर्चेकऱ्यांना संबोधित करण्यास वक्त्यांनी सुरुवात केली. यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे जीवन भालेराव, भारत मुक्ती मोर्चाचे प्रसाद जळवी, इंडियन लॉयर्स असोसिएशनचे अॅड. एस. व्ही. कांबळे, राज्य मूळ रहिवासी महिला संघाच्या माया जमदाडे, मधुकर मातोंडकर यांच्यासह उपस्थितांनी भाषणे केली. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नजीक असलेल्या गोविंद सुपर मार्केट पटांगणावरून सभा संपल्यानंतर दुपारी १.३० वाजता प्रत्यक्ष मोर्चाला सुरुवात झाली.
ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाने मार्गक्रमण केले. मोर्चातील दहाजणांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे लेखी निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांच्याकडे दिले. दुपारी ३ वाजता मोर्चाची सांगता झाली. (प्रतिनिधी)