संगणक साक्षरतेचे धडे झाले स्वीच आॅफ
By admin | Published: April 17, 2015 10:55 PM2015-04-17T22:55:53+5:302015-04-18T00:01:24+5:30
जिल्हा परिषद : प्राथमिक शाळांसाठीचे लाखो रुपये पाण्यात
रहिम दलाल - रत्नागिरी-आजकाल सर्वच व्यवहार संगणकद्वारे केले जात असताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये संगणक असूनही अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणकीय प्रशिक्षण दिले जात नसल्याने ते धूळखात पडले आहेत. जिल्ह्यातील ३४१ प्राथमिक शाळांमधील संगणक बंद अवस्थेत असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी अनुदान नसल्याने संगणक केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. संगणकीय युगामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी लाखो रुपये खर्चून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शासनातर्फे संगणक संच देण्यात आले. त्यासाठी लोकवर्गणी आणि सर्व शिक्षा अभियानातून खर्च करण्यात आला. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून संगणकाचे ज्ञान मिळाल्यास त्यांना भविष्यात फायदा होणार असल्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले. त्यासाठी शिक्षकवर्गालाही एमएससीआयटी कोर्स करण्याची सक्ती करण्यात आली. तरीही आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील सुमारे २० टक्के शिक्षकांनी एमएससीआयटी प्रशिक्षण घेतलेले नाही. संगणकीय युग असल्याने विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संगणकीय ज्ञान मिळावे, यासाठी शासनाने प्राथमिक शाळांमध्ये संगणकाचे धडे देण्यास सुरुवात केली. बँकांचे व्यवहार, शासकीय कामकाजामध्ये संगणकाचा वापर तसेच खासगी कंपन्यांमध्ये कामकाजही संगणकाद्वारे केले जात असल्याने आता संगणक वापराशिवाय पर्याय उरलेला नाही. म्हणून विद्यार्थ्यांनाही संगणकीय प्रशिक्षण देणे क्रमप्राप्त झाले आहे. ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७३३ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी १२७९ शाळांना संगणक संच शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामध्ये काही संगणक संच लोकवर्गणीतून, तर बहुतांश संगणक संच सर्व शिक्षा अभियानातून शाळांना देण्यात आले आहेत. सन २००३-२००४ ते सन २०१२-१३ या कालावधीमध्ये संगणकांचे वाटप करण्यात आले होते. या संगणकांपैकी बहुतांश संगणक संच कालबाह्य झाले आहेत. यामधील बंद असलेल्या संगणकांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून अनुदान मिळत नाही. त्यामुळे संगणकांच्या दुरुस्तीसाठी खर्च कोण करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बंद असलेल्या संगणक संचाची दुरुस्ती करण्यास कोणी प्रयत्न केल्यास त्यासाठी लागणारे पार्टही मिळत नाहीत. त्यामुळे संगणक असूनही ते केवळ शोभेच्या वस्तू बनल्या असून लाखो रुपये पाण्यात गेले आहेत तर संगणक शिक्षणाचा बोऱ्या वाजला आहे. जिल्हा परिषदेने संगणक प्रशिक्षणाचा केलेला प्रयत्न आता निष्फळ ठरला आहे.
या संगणकांमध्ये ३४१ शाळांमधील संगणक संच बंद असून, त्यांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे.
तालुकाचालू बंद एकूण
चिपळूण१०९ ४५ १५४
दापोली ९५ २५ १२०
गुहागर१३० ४८ १७८
खेड१३४ ४२ १७६
लांजा ७१ १५ ९६
मंडणगड ५० १३ ६३
राजापूर१११ ६३ १७४
रत्नागिरी१२२ ३९ १६१
संगमेश्वर१०६ ५१ १५७
एकूण-९३८ ३४१ १२७९
ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत प्राथमिक शाळांचे मूल्यांकन केले जाते. त्यामध्ये इंटरनेट, ई-मेल, संगणकाद्वारे पत्रव्यवहार, ई-लायब्ररी असे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संगणकाद्वारे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये संगणक असूनही तेथे प्रशिक्षण दिले जात नाही.
लाखो रुपयांचा खर्च करून सामान्य विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने ज्या घाईने घेतला, त्या तत्परतेने त्याच्या देखभाल खर्चाची तरतूद केली नाही.
जिल्हा परिषदेच्या ३४१
शाळांमधील संगणक बंद.
१४५४ शाळांमध्ये संगणक नाहीत.
दुरुस्तीसाठी अनुदान मिळत नाही.
२० टक्के शिक्षक एमएससीआयटी प्रशिक्षणाविना.
संगणक असून विद्यार्थी प्रशिक्षणापासून दूर.
२७३३ पैकी १२७९ शाळांमध्ये संगणक.