‘वन बूथ टेन युथ’ संकल्पना राबविणार
By admin | Published: July 22, 2016 10:54 PM2016-07-22T22:54:20+5:302016-07-23T00:19:26+5:30
कणकवली मतदारसंघात : रावराणे
वैभववाडी : बूथ केंद्र्रबिंदू मानून संघटनात्मक पुनर्बांधणीसाठी राष्ट्रीय नेतृत्वाच्या ‘वन बूथ ; टेन युथ’ संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी कणकवली विधानसभा मतदारसंघात २३ जुलै ते १४ आॅगस्ट याकालावधीत ‘बूथ संपर्क अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कणकवली तालुक्यातील हरकुळ येथून शनिवारी (दि. २३) करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
भाजप संपर्क कार्यालयात रावराणे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जेष्ठ नगरसेवक सज्जन रावराणे, तालुकाध्यक्ष राजेंद्र्र राणे, रंगनाथ नागप, तालुका संघाचे संचालक अनंत फोंडके आदी उपस्थित होते. रावराणे म्हणाले की, जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने प्रमुख पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार विधानसभेच्या कणकवली मतदार संघाची जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कणकवली वैभववाडी व देवगड तालुक्यात बूथ संपर्क अभियानाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
रावराणे पुढे म्हणाले की, २३ ते ३० जुलै कणकवली, १ ते ३ आॅगस्ट वैभववाडी आणि ४ ते १४ आॅगस्ट देवगड तालुक्यात बूथ संपर्क अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे.
या अभियान दौऱ्यात जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार अॅड अजित गोगटे, जयदेव कदम, सदाशिव ओगले, राजश्री धुमाळे, प्रज्ञा ढवण तसेच तिन्ही तालुकाध्यक्ष व स्थानिक पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या अभियानानिमित्त प्रत्येक बूथस्थरीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केंद्र्र व राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोचविणे व त्या योजनांचा अधिकाधिक लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
त्याचप्रमाणे गावागावातील प्रलंबित विकास कामांचा आढावा घेऊन पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बूथस्थरीय कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या बूथ समित्यांचे पुनर्गठन करुन आगामी निवडणुकांसाठी संघटन अधिक मजबूत केले जाणार आहे, असे रावराणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
प्रवेशोच्छुक कार्यकर्त्यांशी चर्चा करणार
अन्य पक्षातील काही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. बूथ संपर्क अभियानाच्या निमित्ताने या लोकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करुन पक्ष प्रवेश निश्चित करण्याचा प्रयत्न राहणार आहे. हे बूथ संपर्क अभियान आगामी जिल्हा परिषद व देवगड नगरपंचायतीच्या निवडणूकीची पूर्वतयारी आहे, असे भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे यांनी स्पष्ट केले.