किल्ला प्रवासी होडी वाहतूकीस सशर्त परवानगी : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 03:49 PM2020-11-07T15:49:45+5:302020-11-07T15:51:25+5:30
Sindhudurg port, collector, fort, ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शन घडविणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेस होडी वाहतूक सुरू करण्यास अटी, शर्ती घालत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे पर्यटकांना आता किल्ला दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
मालवण : ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शन घडविणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेस होडी वाहतूक सुरू करण्यास अटी, शर्ती घालत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे पर्यटकांना आता किल्ला दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मार्च महिन्यापासून किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. शासनाने अनलॉक करत पर्यटन सुरू केल्यानंतरही येथील किल्ला प्रवासी वाहतूकीस परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे येथे पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांना बंदर धक्का येथूनच किल्ला दर्शन घेत माघारी परतावे लागत होते. त्यामुळे त्यांच्यातून नाराजी व्यक्त होत होती.
प्रवासी होडी वाहतूक संघटनेने परवानगी मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. याबाबत संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांच्यासह अन्य सदस्यांनी स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी काही अटी, शर्थी घालत प्रवासी बोट वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आमदार नाईक यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
प्रवासी बोट वाहतूक संघटनेने प्रत्येक दिवशी एका बोटीच्या दोन फेऱ्या माराव्यात, सामाजिक अंतर, सॅनिटायझर करणे, पर्यटकांना सुरक्षिततेच्या सूचना देणे आवश्यक आहे. बुकिंगच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्याबाबत खुणा माराव्यात, प्रवाशांच्या सर्व नोंदी, पंधरा दिवसाच्या प्रवासाची माहिती घ्यावी, बुकिंगच्या ठिकाणी ई-पेमेंट सुविधा द्यावी, ऑनलाईन बुकिंगसाठी प्राधान्य द्यावे, प्रवाशांचे तापमान, ऑक्सिजन पातळीत बदल दिसल्यास अशा प्रवाशांना प्रवास करण्यास प्रतिबंध करावा, तिकीट विक्रीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेच्या साहित्याचा वापर करणे बंधनकारक राहील, बोटमन तसेच पर्यटकांनी मास्क, फेसशिल्ड वापरणे बंधनकारक असेल.
सहली, समूहांना प्रतिबंध
एका बोटीमध्ये सामाजिक अंतर पाळत केवळ सहा प्रवाशांना प्रवेश द्यावा, सहली व मोठ्या समूहांना एकत्रित प्रवास करण्यास प्रतिबंध असेल. प्रत्येक फेरीनंतर बोट निर्जंतुक करणे आवश्यक असेल. प्रवासी बीट वाहतूकीसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेणे बंधनकारक राहील अशा अटी, शर्ती घालण्यात आल्या आहेत. याचे उल्लंघन झाल्यास भारतीय दंडसंहिता १८६० (४५) कलम १८८ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग नियंत्रण कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.