आचरेकर बंधूंना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:04 AM2019-11-19T00:04:34+5:302019-11-19T00:04:44+5:30
सिंधुदुर्गनगरी : मालवण बंदर जेठी येथे फिरण्यास आलेल्या मोहित झाड, नीतेश वाईरकर यांना पूर्ववैमनस्यातून खून करण्याच्या इराद्याने जबर मारहाण ...
सिंधुदुर्गनगरी : मालवण बंदर जेठी येथे फिरण्यास आलेल्या मोहित झाड, नीतेश वाईरकर यांना पूर्ववैमनस्यातून खून करण्याच्या इराद्याने जबर मारहाण करणाऱ्या सतीश रामचंद्र आचरेकर व रोहन रामचंद्र आचरेकर या बंधूंना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी पाच वर्षे सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
मालवण बंदर जेठी येथे १ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ७ वाजता मोहित मिलिंद झाड व नीतेश सुरेश वाईरकर हे कुटुंबीयांसह फिरायला आले होते. ते बंदर जेठी येथील कस्टम कार्यालयासमोरील सार्वजनिक रस्त्यावर आपली गाडी पार्क करीत असता आचरेकर बंधंूनी जुन्या रागातून मोहित झाड याला लाकडी बांबू, लोखंडी शिग यांनी मारहाण केली. यावेळी नीतेश वाईरकर सोडवायला गेला असता त्यालाही शिवीगाळ करून तुझा खून करतो, अशी धमकी दिली. तसेच त्यालाही हाताने मारहाण केली. याबाबातची तक्रार मोहित याची बहीण मनाली हिने मालवण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार आचरेकर बंधू यांच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ६ जानेवारी रोजी या दोघांना अटक करण्यात आली. तर त्यानंतर न्यायालयात हजर केले असता १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी झाली. त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या न्यायालयात पूर्ण झाली.
१२ साक्षीदार तपासले
न्यायालयाने यात एकूण १२ साक्षीदार तपासले. यात स्वत: मोहित झाड, त्यांची बहीण मनाली, तहसीलदार धनश्री भालचीन यांनी घेतलेली ओळख परेड, मालवण ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश पांचाळ, प्रत्यक्षदर्शी नीतेश वाईरकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. यात ३२३ व ५०४ या कलमात निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ३०७ कलमाखाली दोषी ठरविण्यात आले आहे. ५ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड अशी ही शिक्षा आहे. कलम ५०६ मध्ये २ वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा आहे. सरकारी पक्षाच्यावतीने तत्कालीन जिल्हा सरकारी अभियोक्ता सूर्यकांत खानोलकर व विद्यमान जिल्हा सरकारी अभियोक्ता संदेश तायशेटे यांनी काम पाहिले.