संघर्ष तीव्र होणार डंपर आंदोलन : जिल्हाधिकारी कार्यालय

By admin | Published: March 6, 2016 10:39 PM2016-03-06T22:39:15+5:302016-03-07T00:45:37+5:30

तोडफोडप्रकरणी नीतेश राणेंसह ३८ जणांना कोठडी; नारायण राणे आज भूमिका जाहीर करणार

Conflict Stumps Dumpar Agitation: Collector Office | संघर्ष तीव्र होणार डंपर आंदोलन : जिल्हाधिकारी कार्यालय

संघर्ष तीव्र होणार डंपर आंदोलन : जिल्हाधिकारी कार्यालय

Next

कणकवली : डंपर आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यकर्त्यांनी घुसून केलेल्या तोडफोडप्रकरणी आमदार नीतेश राणे यांच्यासह ३८ जणांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी न्यायालयाने दिले. दरम्यान, शनिवारी आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराविरुद्ध न्यायालयात जाणार असल्याचे सांगतानाच डंपरचालकांच्या आंदोलनाबाबत उद्या, सोमवारी भूमिका जाहीर करणार असल्याचे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे सांगितले. यामुळे डंपरचालकांच्या आंदोलनावरून निर्माण झालेला संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तोडफोडप्रकरणी आमदार नीतेश राणे यांच्यासह ७० ते ८० जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यापैकी संघर्ष तीव्र होणार
३८ जणांना अटक करण्यात आली. रविवारी दुपारी तीन वाजता ३८ जणांना कणकवली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोनिया कानशिडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. आरोपींतर्फे अ‍ॅड. संग्राम प्रभुगावकर, अ‍ॅड. राजेंद्र रावराणे, अ‍ॅड. अमोल सामंत यांनी बाजू मांडली, तर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. अंबरीश गावडे यांनी बाजू मांडली. पोलिसांनी आरोपींच्या सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आमदार नीतेश राणे यांच्यासह ३८ जणांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.
३८ जणांना कोठडी
आमदार नीतेश राणे, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, संतोष कोदे, नझीर शेख, राधाकृष्ण पावसकर, अनिल नाईक, राजेश ऊर्फ सोनू सावंत, दुर्गाप्रसाद स्वामी, योगेश राऊळ, शोहेब शेख, अनंत मेस्त्री, स्वप्निल मिठबावकर, प्रदीप मांजरेकर, संतोष धुरी, महेश म्हाडदळकर, रमेश वायंगणकर, संजय पालव, चंदन कांबळी, अक्षय सावंत, मिलिंद मेस्त्री, दत्ता सामंत, राकेश म्हाडदळकर, रुपेश जाधव, मुकुंद परब, राकेश परब, संतोष नालंग, सिद्धेश परब, पंढरीनाथ ऊर्फ भाऊ हडकर, महेंद्र्र सांगेलकर, संतोष चव्हाण, हनुमंत बोंद्रे, आनंद ऊर्फ आना भोगले, यशवंत सावंत, सुनील पवार, सुशांत पांगम, अनिल कांदळकर यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. दीपक खरात, शिवा परब, संतोष राऊळ, हेमंत मराठे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले नव्हते.

कणकवलीत कडेकोट बंदोबस्त
आमदार नीतेश राणेंसह डंपर आंदोलकांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याने कणकवली न्यायालय परिसरासह शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश आंबोरे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, पोलीस निरीक्षक सुनील मोरे यांच्या पथकासह राज्य राखीव दलाची तुकडीही सज्ज ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)

शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट
जिल्ह्यातील डंपरधारक व गौण खनिज व्यावसायिकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी लादलेल्या अटींविरोधात न्यायासाठी खासदार विनायक राऊत यांच्यासह प्रमोद जठार, राजन तेली, संदेश पारकर, आदींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली.
संघर्ष तीव्र होणार !
आमदार नीतेश राणे यांची रविवारी मुक्तता करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमान संघटनेने दिला होता. आमदार राणेंना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. नारायण राणे यांनी रविवारी डंपर चालक-मालक संघटनेची बैठक घेतली.


तोडफोड, लाठीमाराच्या चौकशीसाठी समिती
जिल्हाधिकारी कार्यालय तोडफोड आणि त्यानंतर झालेला लाठीचार्ज याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने कोकण आयुक्त तानाजी सत्रे यांची एकसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. तीन-चार दिवसांत अहवाल प्राप्त झाल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले. कपटनीतीने आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांनी केला, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला. आंदोलकांच्या व्यथा समजून घेण्याचे स्पष्ट निर्देश चौकशी समितीला दिले आहेत, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

झाडे टाकून रस्ते अडवले
डंपर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री विजयदुर्ग मार्गावरील दारूम येथे आणि महामार्गावर वारगांव येथे मोठी झाडे रस्त्यावर टाकून रस्ता अडवण्यात आला. महसूल विभागाकडून ही झाडे हटवण्यात आली. आचरा मार्गावर वरवडे उर्सुला स्कूलनजीक रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास झाडे टाकून रस्ता अडवण्यात आला होता. कणकवलीचे पोलीस निरीक्षक सुनील मोरे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत २.३० वाजता रस्ता मोकळा केला.

Web Title: Conflict Stumps Dumpar Agitation: Collector Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.