मालवणात परप्रांतीय, स्थानिक मच्छिमारांत संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2015 12:37 AM2015-05-04T00:37:19+5:302015-05-04T00:38:47+5:30
तळाशील समुद्रात थरारक पाठलाग : धरपकडीत ६ परप्रांतीय ट्रॉलर्स किनाऱ्यावर आणले
मालवण : मालवणात स्थानिक व परप्रांतीय मच्छिमारांमध्ये रविवारी समुद्रात संघर्ष झाला. मालवण ते तळाशिलपर्यंतच्या समुद्रात गोवा- कर्नाटकातून आलेल्या शेकडो ट्रॉलर्सनी दिवसाढवळ््या मासेमारी करायला सुरूवात केल्यामुळे संतप्त झालेल्या येथील पारंपरिक मच्छिमारांनी या बोटींचा भर समुद्रात पाठलाग केला. यावेळी तळाशिल समुद्रात झालेल्या थरारक धरपकडीत ६ परप्रांतीय ट्रॉलर्स स्थानिक मच्छिमारांनी सायंकाळी उशिरा पकडून किनाऱ्यावर आणले आहेत. दरम्यान, परप्रांतीय ट्रॉलर्सचे अतिक्रमण पुन्हा सुरू झाल्यामुळे आगामी काळात समुद्रात ‘सी वॉर’ भडकण्याची चिन्हे आहेत.
रविवारी दुपारपासूनच मालवण ते तळाशिलपर्यंतच्या समुद्रात शेकडो परप्रांतीय बोटींनी किनाऱ्यालगत येऊन मासेमारी करायला सुरूवात केली होती. या बोटींना अटकाव करण्यासाठी येथील पारंपरिक मच्छिमारांनी तत्काळ मत्स्य विभागाला सूचना देऊन कारवाई करावयास सांगितले. मात्र, मत्स्य विभागाकडून उशिरापर्यंत परप्रांतीय बोटींवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे पाहून पारंपरिक मच्छिमार संतप्त झाले.
यावेळी दांडी, मालवण, धुरीवाडा, तळाशिल येथील पारंपरिक मच्छिमारांनी मत्स्य विभागाच्या कारवाईची वाट न पाहता स्वत:च या पर्ससिन ट्रॉलर्सना समुद्रात पकडून मत्स्य विभागाच्या ताब्यात देण्याचे ठरविले. यानुसार सायंकाळी दांडी ते तळाशिलपर्यंतच्या सुमारे २०० मच्छिमारांनी १५ बोटी घेऊन समुद्रात धाव घेतली. पारंपरिक मच्छिमार पकडण्यासाठी मोठ्या संख्येने आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून बहुतांश पर्ससिन ट्रॉलर्स पळून जाण्यात यशस्वी ठरले. यावेळी पारंपरिक मच्छिमारांनी समुद्रात थरारक पाठलाग केला. या पाठलागात पारंपरिक मच्छिमारांना ६ ट्रॉलर्स पकडण्यात यश मिळाले. पकडण्यात आलेले ६ ट्रॉलर्स हे गोवा व साखरीनाटा येथील आहेत. या ट्रॉलर्सवर बालकामगारही असल्याचा दावा पारंपरिक मच्छिमारांनी केला आहे. थरारक पाठलागानंतर पकडण्यात आलेले सहाही ट्रॉलर्स पारंपरिक मच्छिमारांनी सायंकाळी उशिरा धुरीवाडा येथील समुद्रात आणले. यावेळी किनाऱ्यावर शेकडो पारंपरिक मच्छिमार जमा झाले होते. यावेळी छोटू सावजी म्हणाले, मत्स्य दुष्काळामुळे मागील चार महिने आमच्या बोटी बंद आहेत. मात्र आता दिवसाढवळ््या परप्रांतीय बोटी येऊन आमच्या हक्काची मासळी हिरावून नेत आहेत.
विकी तोरस्कर म्हणाले, मत्स्य विभाग व पोलीस परप्रांतीय बोटींवर कोणतीही कारवाई करीत नसल्यामुळे पारंपरिक मच्छिमारांनी रविवारी या बोटी पकडून मत्स्य विभागाच्या ताब्यात देण्याचे ठरविले आहे. यामुळे पारंपरिक मच्छिमारांना धरपकड करावी लागली. पारंपरिक मच्छिमारांनी समुद्रात धरपकड सुरू केल्याने समजताच मत्स्य विभागानेही आपल्या गस्ती नौकेद्वारे परप्रांतीय ट्रॉलर्स पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेला एकही परप्रांतीय ट्रॉलर्स पकडण्यात यश आले नाही. पकडून आणलेले ट्रॉलर्स पोलीस व मत्स्य विभागाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)